डोक्यात दगड घालून बांधकाम मुकादमाचा खून ; दोन मजुरांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 05:06 PM2020-05-16T17:06:12+5:302020-05-16T17:09:06+5:30
मजुरीचे पैसे न दिल्याच्या कारणावरुन दोन मजुरांनी बांधकाम मुकादम असलेल्या राजू पवार (वय ३७, रा. अमरावती) याच्या छातीवर आणि डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. ही घटना कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन मजुरांना अटक केली आहे.
कोरेगाव : मजुरीचे पैसे न दिल्याच्या कारणावरुन दोन मजुरांनी बांधकाम मुकादम असलेल्या राजू पवार (वय ३७, रा. अमरावती) याच्या छातीवर आणि डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. ही घटना कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन मजुरांना अटक केली आहे.
नागेश रामचंद्र बंजत्री (रा. चिंचोळी, ता. मुद्दे बिहाळ, जि. विजापूर, कर्नाटक), किरण बाबुराव पाटील ( रा. उजळाईवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर, सध्या दोघेही रा. भीमनगर, ता. कोरेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजू पवार याच्यासोबत नागेश बंजत्री, किरण पाटील हे बांधकामावर मजूर म्हणून काम करत होते. हे तिघेही जांब बुद्रुक, ता. कोरेगाव येथे निवासी इमारतीचे काम सुरु असल्याने गत १५ दिवसांपासून तेथेच राहत होते.
गुरुवारी सायंकाळी तिघेजण जांब बुद्रुक ते जळगाव रस्त्याने चालत येत होते. मजुरीच्या पैशांवरुन राजू पवार याच्याबरोबर नागेश बंजत्री व किरण पाटील यांचा वाद झाला. जळगाव गावानजिक माळ नावाच्या शिवारात तिघांमध्ये जोरदार भांडण झाले. तिघेजण मुख्य रस्त्यापासून आतील बाजूस शेतातील ओघळीमध्ये गेले. तेथे दोघांनी राजू याला खाली पाडले.
नागेश याने जवळच पडलेला मोठा दगड घेतला आणि तो राजू याच्या छातीवर घातला. त्यानंतर किरण याने तोच दगड घेऊन राजूच्या डोक्यात घातला. यामध्ये राजूच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला. या प्रकारानंतर दोघांनी तेथून पळ काढला.
शुक्रवारी सकाळी जळगाव येथील बापू कृष्णात जाधव हे आपल्या शेतात गेले होते, त्यावेळी त्यांना ओढ्यामध्ये मृतदेह दिसला. त्यांनी पोलीस पाटील विश्वनाथ पवार यांना याची माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार पोलिसांनाही समजला. पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. काही तासांतच पोलिसांनी नागेश आणि किरण यांना अटक केली.
राजू पवारचा ठाव ठिकाणा नाही..
राजू पवार हा गत काही महिन्यांपासून कोरेगाव तालुक्यात काम करत आहे. तो सर्वांना अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगत होता. मात्र, घरातून त्याला कमी प्रमाणात फोन यायचे, जर एखादा फोन आला तर, तो कानडीमध्ये बोलत असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. भीमनगरमध्ये तो तात्पुरत्या स्वरुपात राहत होता. राजू पवार हा नेमका कुठला आहे, त्याचा पत्ता काय, त्याने यापूर्वी कोणाकडे काम केले आहे, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.