Satara Crime: दोघांच्या मृत्यूबरोबर कोवळा जीवही झाला ‘शिकार’; मोबाइल नंबर ब्लॉक केल्याचा राग, अन् गोड बोलून केला घात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 11:45 AM2023-02-28T11:45:05+5:302023-02-28T11:45:26+5:30
स्नेहल अडीच महिन्यांची गरोदर होती. हे ऐकल्यावरच त्याच्यात सैतान निर्माण झाला. दत्तात्रयने क्षणाचाही विचार न करता स्नेहलच्या पोटावर सपासप असंख्य वार केले
रशिद शेख
औंध : वांझोळी, ता. खटाव येथील सख्ख्या मावस भाऊ-बहिणीच्या प्रेमप्रकरणात एक कोवळा जीवही शिकार झाला. यामुळे या प्रेमप्रकरणाच्या विनाशकारी वळणाने वांझोळी परिसर अक्षरश: नि:शब्द झालाय. नात्याला काळिमा फासणाऱ्या या प्रेमाविषयी वांझोळी परिसरात प्रेम म्हणजे नेमके काय असतं, अशी चर्चा सुरू झालीय.
काही महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या स्नेहलने आपल्या नवीन संसाराची स्वप्ने उराशी बाळगली होती; पण माहेरी आलेल्या स्नेहलला किंचितशीही कल्पना नसेल की पुन्हा आपण सासरी जाणार नाही. आणि मावस बहिणीच्या प्रेमात पूर्ण संतुलन बिघडलेल्या दत्तात्रयने मात्र तिला संपविण्याची पुरती तयारी केली असल्याचे दिसून आले. हातावर पोट भरून एकाच गावात दोन्ही बहिणी राहत असल्याने त्यांना किंचितही कल्पना आली नाही. दोन्हीही बहिणींच्या संसाराची अशी अवस्था होईल, असे स्वप्नातही त्यांना वाटले नव्हते.
दत्तात्रयने स्नेहलला जिवे मारण्याचा अगोदरच डोक्यात कट शिजवीला होता. त्यासाठी त्याने चाकू व कोयता खरेदी करून ठेवला होता. तर पँटच्या खिशात चाकू ठेवण्यासाठी जागा करून ठेवली होती. घटनेच्या वेळी घराच्या कट्ट्यावर सर्वजण बोलत बसले होते. त्यानंतर दोन्हीही आई गेल्यानंतर दत्तात्रयने स्नेहलला ओढत आत नेले असावे, कारण त्या कट्ट्यावर बांगड्या पडल्या होत्या. विशेष म्हणजे स्नेहल अडीच महिन्यांची गरोदर होती. हे ऐकल्यावरच त्याच्यात सैतान निर्माण झाला. दत्तात्रयने क्षणाचाही विचार न करता स्नेहलच्या पोटावर सपासप असंख्य वार केले. तर इतर ठिकाणीही वार केल्यामुळे तिच्या पोटातील बाळासह दोन जीवांचा अंत झाला. त्यानंतर त्याने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.
कदाचित ती गरोदर असल्याचेही त्याला आवडले नसावे; पण या दुनियेत येण्याअगोदर कोवळ्या जीवालाही ही दुनिया पाहता आली नाही. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे व सर्व पोलिस पथक जेव्हा घटनास्थळी पोहोचले. तेव्हा हे हृदयद्रावक दृश्य पाहून सारेच अवाक झाले.
मोबाइल नंबर ब्लॉक केल्याचा सर्वाधिक राग
स्नेहलने दत्तात्रयचा मोबाइल नंबर ब्लॉक केल्याने अस्वस्थ तो अस्वस्थ होता. ती माहेरी येण्याची वाटच तो बघत होता. सुरुवातीला गोड बोलल्याने स्नेहलला तो काय करेल, याचा अंदाज आला नाही. त्यामुळेच ती जिवाला मुकली.
अगोदरच्या आणाभाका शपथी नडल्या!
स्नेहल आणि दत्तात्रयच्या प्रेमप्रकरणात घेतल्या असणाऱ्या आणाभाका शपथी नडल्या असाव्यात, असं बोललं जातंय. नवीन संसारात रमलेल्या स्नेहलला जुन्या आठवणींना विसरून जायचे होते. मात्र, दत्तात्रयला ते विसरायचे नव्हते का, अशीही चर्चा परिसरात होती.