मुंबईत खून करून भाडळे घाटात विल्हेवाट

By admin | Published: September 5, 2014 11:00 PM2014-09-05T23:00:23+5:302014-09-05T23:28:09+5:30

अनैतिक संबंध : मानलेल्या बहिणीसाठी व्यावसायिकाचा मृतदेह जाळला; महिलेसह सातजणांना अटक

Murder in Mumbai and disposal of land in Bhadle Ghat | मुंबईत खून करून भाडळे घाटात विल्हेवाट

मुंबईत खून करून भाडळे घाटात विल्हेवाट

Next

वाठार स्टेशन : मुंबई येथील एका महिलेच्या घरात अनैतिक संबंधातून व्यावसायिकाचा खून करून, नंतर त्याच्याच कारमधून मृतदेह वाठार स्टेशनजवळील फडतरवाडी-भाडळे घाटात आणून पेटवून दिला. भेळ गाडीवाल्यामुळे ही घटना २१ दिवसांनंतर उघडकीस आली. याप्रकरणी संबंधित महिलेसह सातजणांना वाठार पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, कलवीरसिंग गुज्जर (वय ४२) हे इलेक्ट्रिक वस्तूंचे व्यावसायिक घाटकोपरला राहत होते. घराजवळच त्यांचे दुकान आहे. दुकानात रतन ही महिला दहा वर्षांपासून कामास होती. तिच्याशी कलवीरसिंगचे अनैतिक संबंध होते. दरम्यान, अन्य महिलांशीही कलवीरसिंगचे संबंध असल्याचा राग धरून रतनने दुकानात जाणे बंद केले. तरीही, कलवीरसिंग रतनच्या घरी जातच होता.
दरम्यान, रतनने मानलेला भाऊ विवेक येवले (रा. अंबवडे संमत, ता. कोरेगाव) याला १३ आॅगस्ट रोजी याबाबतची माहिती दिली. विवेकने सातारा जिल्ह्यातील त्याच्या अन्य पाच मित्रांना घाटकोपरला बोलावून घेतले. त्याच रात्री कलवीरसिंग रतनच्या घरी आल्यानंतर सातजणांनी तोंडावर उशी दाबून त्याचा खून केला. त्यानंतर कलवीरसिंगच्याच कारमधून (एमएच ०३- ५१५१) त्याचा मृतदेह वाठार स्टेशनजवळील फडतरवाडी-भाडळे घाटातील सामाजिक वनीकरणाच्या हद्दीत आणून टाकला. तिथेच रॉकेल ओतून तो पेटवून दिला. कलवीरसिंगची मुलगी व त्याच्या मित्रांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दिली होती.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सातारा येथील शाहू स्टेडियमजवळील एका भेळगाडीवर आरोपींपैकी एक तरुण पृथ्वीराज वैराट हा गोंधळ घालत असताना भेळवाल्याने शेजारील गुन्हे शाखेच्या पोलिसाला बोलाविले. त्यावेळी पोलिसांनी खाक्या दाखविताच पृथ्वीराजने घाबरून घाटकोपरच्या घटनेचे भिंग फोडले. त्यानंतर पोलिसांनी विवेक अशोक येवले, निखिल प्रकाश वाघमळे (दोघे रा. अंबवडे संमत, कोरेगाव), राजेश विलास कांबळे (रा. अंबवडे (सं.), कोरेगाव, हल्ली रा. बौद्धविहार, करंजे), संतोष बाबासाहेब बनसोडे (रा. बौद्धविहार, करंजे), पृथ्वीराज अनिल वैराट, दीपक नारायण आवळे (दोघे रा. किकली, ता. वाई) व रतन दयानंद गायकवाड (मूळ रा. भिगवण, जि. पुणे) या सातजणांना ताब्यात घेतले. कलवीरसिंगची मुलगी परबजित कौर हिने या सर्वांविरोधात फिर्याद दिली आहे. (वार्ताहर)

मृतदेहाचे जळालेले अवशेष ताब्यात
एकवीस दिवसांपूर्वी वाठार स्टेशनजवळील भाडळे घाटात ज्या ठिकाणी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, त्याठिकाणी आज पोलीस गेले. पावसामुळे अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे अवशेष त्यांनी ताब्यात घेतले. संशयितांकडून मिळालेल्या माहितीवरून रतन गायकवाड हिलाही बारामती येथे जाऊन रात्री अटक केली.

Web Title: Murder in Mumbai and disposal of land in Bhadle Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.