Satara Crime: वाईत अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून, खूनाच्या घटनेने उडाली एकच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 05:31 PM2022-12-29T17:31:39+5:302022-12-29T17:43:18+5:30
पोलीस व लष्कर भरतीसाठी वाई येथे घेत होता प्रशिक्षण
वाई : वाई येथील सिद्धनाथवाडी परिसरात एका अल्पवयीन मुलाचा अज्ञाताने धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. खुनाच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. न्यास खरात असे या मृत अल्पवयीन मुलाचे नाव आहे. तो बारावी मध्ये शिरवळ येथील एका महाविद्यालयात शिकत होता. पोलीस व लष्कर भरतीसाठी वाई येथे तो प्रशिक्षण घेत होता.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, काल, बुधवारी तो घरातून कामानिमित्त बाहेर पडला. बराच वेळ तो घरी न आल्यामुळे रात्रीच्या सुमारास नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शोध मोहीम राबविली मात्र त्याचा शोध लागला नाही. दरम्यान आज एका शेताच्या बांधावर त्यांचा मृतदेह आढळून आला. त्याच्या अंगावर धारदार शस्त्राचे वार होते.
घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. अधिक तपासासाठी ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. खूनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.