पैशांसाठी तगादा लावल्याने खासगी सावकाराचा खून, साताऱ्यात उडाली एकच खळबळ
By दत्ता यादव | Published: November 29, 2022 11:54 AM2022-11-29T11:54:37+5:302022-11-29T12:38:30+5:30
अपहरण करुन खून केल्यानंतर मृतदेह डोंगरावरील ओढ्यात टाकून दिला
सातारा : व्याजाने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावल्याने खासगी सावकार विलास महिपती जाधव (वय ५५, रा. खोडद, ता. सातारा) यांचा गळा आवळून निघृर्ण खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना काल, सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
आकाश तुकाराम जांभळे (रा. जांभगाव, ता. सातारा), संतोष संभाजी मोरे (रा. रामकृष्णनगर, काशीळ, ता. सातारा), संजय रामचंद्र जाधव (रा. खोडद, ता. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २० नोव्हेंबरला दुपारी विलास जाधव हे घरासमोरील ज्वारी गोळा करत असताना जेवण करून येतो असे सांगून निघून गेले. परंतू घरी न आल्याने त्यांची पत्नी जयश्री जाधव यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची तक्रार दिली. स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केल्यानंतर विलास जाधव हे खासगी सावकारी करत होते. त्यांनी अनेकांना व्याजाने पैसे दिले होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करण्यास सुरूवात केली.
दरम्यान, सातारा तालुक्यातील निसराळे फाट्यावर विलास जाधव हे काही जणांसोबत बोलत उभे असल्याचे काही लोकांनी पाहिले होते. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही तपासले असता आरोपींची ओळख पटली. पोलिसांनी तातडीने तिघा आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर खासगी सावकार विलास जाधव यांचा खून केल्याची कबुली दिली.
अपहरण करुन केला खून
त्यानंतर पोलिसांनी संशयितांना घटनास्थळावर नेले. या तिघांनी विलास जाधव यांचे गाडीतून अपहरण केले. कास पठाराजवळील पेट्री येथे असलेल्या छोट्याशा डोंगराजवळ त्यांना नेण्यात आले. या ठिकाणी त्यांचा नायलॉनच्यादोरीने गळा आवळला. त्यानंतर दगडाने त्यांच्या डोक्यावर हल्ला करण्यात आला. ते मृत झाल्यानंतर आरोपींनी विलास जाधव यांना डोंगरावरील ओढ्यात टाकून दिले. पोलिसांनी जाधव यांचा मृतदेह ओढ्यातून वर काढला. तिघा आरोपींवर बोरगाव पोलीस ठाण्यात खून करणे, अपहरण आदी कलमान्वे गुन्हा दाखल केला आहे