मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात युवकाचा खून, सातारा जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 12:14 PM2022-11-28T12:14:42+5:302022-11-28T12:15:06+5:30
कऱ्हाड : मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात युवकावर कोयत्याने वार करुन त्याचा खून करण्यात आला. जुळेवाडी, ता. कऱ्हाड येथे पुजारी चौकात ...
कऱ्हाड : मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात युवकावर कोयत्याने वार करुन त्याचा खून करण्यात आला. जुळेवाडी, ता. कऱ्हाड येथे पुजारी चौकात शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राजवर्धन महादेव पाटील (वय २४, रा. जुळेवाडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
याप्रकरणी विजय बाबुराव काशिद (रा. जुळेवाडी) याच्यावर कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्यावर अटकेची कारवाई करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुळेवाडी येथील एका युवकाचा शनिवारी वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त रात्री केक कापला जाणार होता. गावातील पुजारी चौकात त्यासाठी युवक जमले होते. राजवर्धन हासुद्धा त्याठिकाणी गेला.
राजवर्धनच्या घरापासून काही अंतरावरच हा चौक आहे. वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना गावातीलच विजय काशिद या युवकाने अचानक राजवर्धन याच्यावर धारदार कोयत्याने दहा ते पंधरा वार केले. मान, हात, पाय, पाठेवर वर्मी घाव बसल्यामुळे राजवर्धन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेने युवकांची धावपळ उडाली. वार केल्यानंतर राजवर्धनला रक्तबंबाळ स्थितीत सोडून आरोपी विजय काशिद तेथून पसार झाला. तर राजवर्धन त्याही परिस्थितीत चालत घरापर्यंत गेला. कुटूंबिय व ग्रामस्थांनी त्याला रुग्णालयात हलवले. मात्र, त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती समजताच अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर यांच्यासह पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच आरोपीचा शोध घेण्याच्या सुचना पोलीस पथकाला दिल्या. या घटनेने गावात तणावाचे वातावरण झाले. त्यामुळे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
दरम्यान, रविवारी सायंकाळी आरोपी विजय काशिद याला ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्याला रात्री उशिरा अटक केले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे तपास करीत आहेत.