एकीवच्या कड्यावरून पडलेल्या ‘त्या’ दोन तरुणांचा खूनच

By दत्ता यादव | Published: July 18, 2023 12:04 AM2023-07-18T00:04:12+5:302023-07-18T00:04:51+5:30

वादावादीनंतर दिले ढकलून; अनोळखी दोन पर्यटकांवर गुन्हा.

murder of those two youths who fell from the cliff of ekiv | एकीवच्या कड्यावरून पडलेल्या ‘त्या’ दोन तरुणांचा खूनच

एकीवच्या कड्यावरून पडलेल्या ‘त्या’ दोन तरुणांचा खूनच

googlenewsNext

दत्ता यादव, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : एकीव, ता. जावळी धबधब्याजवळील साडेसातशे फूट कड्यावरून खाली पडलेल्या दोन तरुणांच्या मृत्यूला वेगळे वळण लागले असून, या तरुणांचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वादावादी झाल्यानंतर अनोळखी दोन पर्यटकांनी त्यांना दरीत ढकलून दिले. हा प्रकार प्रत्यक्षदर्शीने पाहिल्यानंतर पोलिसांनी मेढा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला.

अक्षय शामराव अंबवले (वय २८, रा. बसाप्पाचीवाडी, ता. सातारा), गणेश अंकुश फडतरे (वय ३४, रा. करंजे पेठ, सातारा) अशी खून झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत मेढा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जावळी तालुक्यातील एकीव धबधब्यावर रविवारी दुपारी पर्यटनासाठी साताऱ्यातील युवकांचे दोन ग्रुप गेले होते. पंकज शिंदे, समाधान मोरे (रा. बसाप्पाचीवाडी, ता. सातारा) आणि अक्षय अंबवले, गणेश फडतरे हे चाैघेही एकत्र धबधबा पाहण्यासाठी गेले होते. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पंकज आणि समाधान हे दुचाकीवरून पुढे निघाले तर पाठीमागून दुचाकीवरून अक्षय आणि गणेश हे दोघे येत होते. मात्र, बरेच अंतर पुढे गेल्यानंतर ते दोघे अद्याप आले नाहीत म्हणून पंकज शिंदे हा दुचाकीवरून परत त्यांना पाहण्यासाठी आला. त्यावेळी दोन तरुण अक्षयला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होते. तर त्यांच्यासोबत असलेली इतर मुले रस्त्यावर उभी होती. गणेश फडतरे हा भांडणे सोडविण्यासाठी गेला असता त्यालाही ती मुले मारहाण करू लागली. त्यानंतर त्या दोन मुलांनी अक्षय आणि गणेशला दरीत ढकलून दिले. पंकज शिंदे व त्याचा मित्र तेथे येताच सर्व मुले तेथून पळून गेली. या प्रकारानंतर पंकजने मेढा पोलिसांना याची माहिती दिली. मेढा पोलिस आणि शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरू केले. अंधार, पाऊस, वारे असल्यामुळे दरीत उतरणे अत्यंत धोकादायक होते. अशा अवस्थेतही ट्रेकर्सचे जवान दरीत उतरले. तेव्हा अक्षय आणि गणेश या दोघांचाही मृत्यू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रात्री साडेबारा वाजता दोघांचेही मृतदेह दरीतून वर काढण्यात जवानांना यश आले.

‘त्यांना’ दरीत ढकलून दे, मुले ओरडत होती...

‘ते’ अनोळखी दोन तरुण अक्षय आणि गणेशला मारहाण करत होते. त्यावेळी रस्त्यावर उभी असलेली काही मुले त्यांना दरीत ढकलून दे, असे ओरडत होती. तेव्हा पहिल्यांदा गणेशला दरीत ढकलून दिले. त्यानंतर अक्षयलाही त्यांनी दरीत ढकलून दिले. हा धक्कादायक प्रकार पंकज शिंदे याने आपल्या डोळ्यादेखत पाहिला. 

Web Title: murder of those two youths who fell from the cliff of ekiv

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.