Satara Crime: प्रेमप्रकरणातून युवकाचा निर्घृण खून, वाई तालुक्यात महिन्यातील दुसरी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 11:23 AM2023-02-04T11:23:59+5:302023-02-04T11:24:21+5:30
गावात बंद पाळून निषेध
वाई : प्रेम प्रकरणातून वाई तालुक्यातील खानापूर येथील मोलमजुरी करणाऱ्या युवकाचा परखंदीत निर्घृण खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. अभिषेक रमेश जाधव (वय २०) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. वाई तालुक्यात एका महिन्यात दुसरा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे-खराडे यांनी घटनास्थळी भेट दिली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, परखंदी गावातील काही लोक शुक्रवारी सकाळी शेताकडे जात असताना त्यांना एका युवकाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी ही माहिती तातडीने वाई पोलिसांना दिली.
त्यानंतर पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाजवळ असलेल्या कागदपत्राच्या आधारे हा युवक खानापूर येथील अभिषेक जाधव असल्याचे समोर आले. खानापूर गावांत चौकशी केली असता गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास खानापूरमधील रहिवासी असलेल्या रहीम नावाच्या एका युवकाने त्याला परखंदी परिसरात बोलावून नेल्याचे समजले. त्यानंतर त्याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी परखंदी परिसरात आढळून आल्याने गावात संतापाची लाट उसळली.
अभिषेक हा मोलमजुरीचे काम करत होता. त्याच्या पश्चात आई, लहान बहीण आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह गावात आणण्यात आला. तेव्हा आई व लहान बहिणीच्या हंबरड्याने परिसर गहिवरून गेला. एकुलता एक कमावता मुलगा गेल्याने जाधव कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, खानापूर गावाने त्वरित ग्रामसभेचे आयोजन करून गाव बंदचा निर्णय घेत दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. गुंडगिरी करणाऱ्या व्यक्तींना गावात प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, अधिक तपास वाई पोलिस करीत आहेत.
गावात बंद पाळून निषेध
खानापूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, गावाने कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त केला आहे. वाई पोलिस ठाण्यात खुनाची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे.