रंगकाम करणा-याचा सातारा पालिकेत डोक्यात दगड घालून खून, कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 12:37 PM2018-03-11T12:37:36+5:302018-03-11T12:37:36+5:30
पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जिन्याजवळ झोपलेल्या एका रंगकाम करणा-या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना रविवारी सकाळी सव्वाअकरा वाजता उघडकीस आली.
सातारा : पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जिन्याजवळ झोपलेल्या एका रंगकाम करणा-या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना रविवारी सकाळी सव्वाअकरा वाजता उघडकीस आली.
राजेंद्र बबन सूर्यवंशी (वय ४०, रा. घोरपडे कॉलनी केसरकर पेठ, सातारा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राजेंद्र सूर्यवंशी हे रोज रात्री सातारा पालिकेच्या प्रवेशद्वारासमोरील जिन्याखाली झोपत असे. नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री ते जिन्याखाली झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताने त्यांच्या डोक्यात दगड घालून खून केला.
नगरपालिकेचे काही कर्मचारी रविवारी पालिकेत आले असता खुनाचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सातारा शहर आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचा-यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. गाढ झोपेत असलेल्या राजेंद्र सूर्यवंशी यांचा कोणी व कशासाठी खून केला, हे अद्याप समोर आले नाही.
पालिकेच्या जिन्याखाली रोज रात्री झोपल्यानंतर राजेंद्र हे सकाळी लवकर उठून तेथून जात होते. त्यामुळे त्यांच्याबाबत फारसी कोणाला माहिती नाही. रविवारी पालिकेला सुटी असल्यामुळे सकाळी कोणी फिरकले नाही. त्यामुळे हा प्रकार उघडकीस येण्यास बराच वेळ लागला.
सूर्यवंशी हे रंगकाम करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेऊन त्यांच्या खुनापाठीमागचे कारण लवकरच समोर येईल, असे पोलीस अधिकाºयांनी सांगितले. सध्या या ठिकाणी पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.