इनामी जमिनीच्या वादातून केला खून
By Admin | Published: December 16, 2015 11:22 PM2015-12-16T23:22:58+5:302015-12-16T23:32:21+5:30
परभणी : शासनाकडून मिळालेल्या ईनामी जमिनीवर खोटी नोंद करून मालकी हक्क दाखविल्या प्रकरणी आरोपीविरुद्ध मयत इसमाच्या पित्याने तक्रार दिली होती.
परभणी : शासनाकडून मिळालेल्या ईनामी जमिनीवर खोटी नोंद करून मालकी हक्क दाखविल्या प्रकरणी आरोपीविरुद्ध मयत इसमाच्या पित्याने तक्रार दिली होती. या प्रकरणाचा निकाल ८ डिसेंबर रोजी लागला. आपल्या विरोधात लागलेल्या निकालाच्या वादातून आरोपीने फिर्यादीसोबत वाद घातला आणि या वादातच एकाचा खून झाला. अशा प्रकारे हा खून घडल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिल्याने वांगीरोड येथील प्रकरणाचे सत्य उलगडले आहे.
शहरातील वांगीरोड भागात सर्वे नं. २५० मध्ये शासनाची जमीन आहे. ही जमीन १९९० च्या सुमारास मसियोद्दीन हफियोद्दीन शेख यांना मिळाली होती. त्यांच्या नावे ९ एकर जमीन ईनामी झाली होती. याच सर्वेमध्ये मसियोद्दीन यांच्या बहिणीच्या नवऱ्याने नावे अमिरोद्दीन गौसोद्दीन शेख यांनी १९९२ ला ६ एकर शेत असल्याचे कागदोपत्री लिहून घेतले होते. त्यावेळी १९९२ ला मसियोद्दीन यांनी अमिरोद्दीन यांच्या विरोधात खोटी नोंद करीत दावा केल्याची तक्रार दिली होती. हे प्रकरण न्यायालयात २०१५ पर्यंत सुरू होते. या प्रकरणाचा निकाल ८ डिसेंबर २०१५ रोजी लागला. यामध्ये निकाल मसियोद्दीन यांच्या बाजूने लागला. त्यानंतर १३ डिसेंबर रोजी आरोपी अमिरोद्दीन यांचा मुलगा व मसियोद्दीन यांचा मुलगा यांच्यात शेतातील पाईप घेण्याच्या कारणावरून वाद झाला. झालेला प्रकार अमिरोद्दीन यांच्या मुलाने त्यांच्या घरात सांगितला. त्यानंतर अमिरोद्दीन यांच्या घरातील त्यांचा मुलगा महंमद अमिरोद्दीन, पत्नी गोरीबीन अमिरोद्दीन, रहिसोद्दीन व अमिरोद्दीन यांनी मसियोद्दीन यांच्या कुटुंबाशी वाद घातला. १४ डिसेंबर रोजी झालेल्या वादात मसियोद्दीन यांचा मुलगा अजहर मसियोद्दीन हा मृत्यू पावला. तर मसियोद्दीन यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत. घटना घडल्यानंंतर सुरुवातीला हा खून कशामुळे झाला? हे समोर आले नव्हते. शेतीचा वाद असल्याचे बोलले जात होते. या प्रकरणी नवामोंढा पोलिसात गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी दोन दिवसात तपासाची चक्रे गतीने फिरवून चार आरोपींना अटक करीत मूळ खुनाचे कारण आरोपीकडून कबूल करून घेतले आहे. यामुळे झालेला खूनाचा प्रकार हा ईनामी जमिनीच्या वादातून घडल्याचे समोर आले.