खून, दरोडा, अत्याचाराने जिल्हा हादरला !

By admin | Published: December 30, 2015 10:31 PM2015-12-30T22:31:35+5:302015-12-31T00:29:36+5:30

मारामारीमुळे वाढला ‘क्राईम रेट’ : सोनसाखळी चोरीचे प्रकार आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश

Murder, robbery, oppressed district! | खून, दरोडा, अत्याचाराने जिल्हा हादरला !

खून, दरोडा, अत्याचाराने जिल्हा हादरला !

Next

दत्ता यादव --सातारा -२०१५ मध्ये जिल्ह्यात अनेक नाट्यमय आणि जिल्ह्याला हादरून सोडणाऱ्या घटना घडल्या. त्यामध्ये खून, दरोडा, अत्याचार आणि अपहरण यासंह गुन्हेगारी टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याचा चांगला प्रयत्न झाला.
सरत्या वर्षाला निरोप देत असतानाच सदैव जिल्हा पोलीस दलाच्या पटलावर कायम असलेल्या सल्या चेप्या याच्या गुन्हेगारी क्षेत्राचा अंत झाला. मात्र २०१५ च्या सुरुवातील अनेक नाट्यमय घटना घडल्या. मुंबई येथे कार्यरत असलेला हवालदार धर्मराज काळोखे याला खंडाळा येथे ड्रग्ज प्रकरणात अटक केली. यामध्ये ड्रग्ज माफीया बेबी पाटणकर हिचेही नाव पुढे आले होते. बेबी पाटणकरला अटक झाल्यानंतर काही दिवसांतच तिची जामिनावर मुक्तताही झाली. मात्र धर्मराज काळोखे अद्यापही कारागृहाच्या काळोख्या कोठडीत आहे. सातारा शहरापासून जवळ असलेल्या खावली येथे सहाजणांनी दरोडा टाकून एका महिलेवर सामूहिक अत्याचार केला होता. जिल्ह्यात पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याने संपूर्ण पोलीस दल अक्षरश: हादरून गेले होते. कसलाही पुरावा नसताना सातारा पोलिसांनी कौशल्याने हा दरोडा उघडकीस आणला. ज्या ठिकाणी घटना घडली. त्या ठिकाणावरील एका ढाब्यावरील कर्मचाऱ्यांचा या प्रकरणात समावेश असल्याचे अखेर निष्पन्न झाले.
सातारा तालुक्यातील बोरगावजवळ कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेल्या खासगी बसवर दरोडा टाकून कुरिअरच्या व्यक्तीला पिस्तुलाचा धाक दाखवून लूटले होते. हा गुन्हाही पोलिसांनी काही दिवसांतच उघडकीस आणला.
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू होण्यापूर्वी चोरटे आल्याच्या व्हाट्सअ‍ॅपवरच्या अफवा सुरू झाल्या. ग्रामीण भागात नागरिकांकडून स्वत: गस्तीचे प्रमाण वाढले होते. परळी खोऱ्यातील एका गावात बॅटऱ्या दिसल्या म्हणून पोलिसांना बोलावून घेतले आणि काजवे निघाले.
चोर समजून फिरस्त्या व्यक्तींना अनेकांना मारहाण झाली. हातावर पोट असणाऱ्यांची उपासमारीची वेळ आणि फिरत्या विक्रेत्यांना गावबंदीही झाली.
त्यामध्ये परप्रांतियांनाही सोडले नाही. पोलिसांची डोकेदुखी वाढल्यामुळे अखेर पोलीस अधीक्षकांनाच यामध्ये लक्ष घालावे लागले. एखाद्याला मारहाण केली तर गुन्हे दाखल करू, अशी तंबी दिल्यामुळे काही अंशी हे प्रकार थांबले. मात्र ग्रामपंचायत निवडणूक संपल्यानंतर तर व्हाट्सअ‍ॅपवरच्या अफवा बंद झाल्या.
कऱ्हाड तालुक्यातील उंडाळे येथील वडापचालक विजयसिंह पाटील याचा खून झाला. हा खून वडाप व्यवसायाच्या चढाओढीतून झाल्याने तपासात अखेर निष्पन्न झाले.महाबळेश्वर तालुक्यामध्ये एका युवतीवर दोघाजणांनी अत्याचार केला. संबंधित युवती आणि एक महिला चालत घरी जात असताना हा प्रकार घडला. अशा प्रकारे २०१५ वर्ष जिल्हा पोलीस दलासाठी डोकेदुखीचे ठरले.


तेरा टोळ्या झाल्या तडीपार !
जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका वर्षात तब्बल तेरा टोळ्या तडीपार करण्याचा विक्रम आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी राबविलेल्या तडीपार सत्रामध्ये महाबळेश्वरचे नगरसेवक कुमार शिंदे आणि त्यांच्या भावाचाही समावेश आहे. कऱ्हाड, फलटण, सातारा या ठिकाणच्या टोळ्या तडीपार करण्यात आल्या. त्यामुळे गर्दी, मारामारीसारखे गुन्हेही आटोक्यात आले. कऱ्हाड आणि सातारा शहरात पिसीआर व्हॅन सुरू केल्यामुळे रात्रीत होणाऱ्या घरफोड्याही कमी झाल्या.
कऱ्हाडध्ये टोळी युद्धातून दुहेरी खूनप्रकरणही घडले.
सातारा आकाशवाणी झोपडपट्टीत एका महिलेचा खून झाला. मात्र या खुनाचे कारण अद्याप पोलिसांना उलगडता आले नाही. फलटण तालुक्यातील झिरपवाडी हॉटेल व्यावसायिक जोतीराम चव्हाण यांची सहाजणांनी गोळ्या घालून व तलवारीने वार करून निर्घृण हत्या केली. यानंतर संतप्त ग्रामस्थ व नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती. परंतु पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हल्लेखोरांना पकडण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर जमाव शांत झाला. याप्रकरणी पाचजणांना अखेर अटक केली.

Web Title: Murder, robbery, oppressed district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.