लोखंडी तवा डोक्यात घालून पत्नीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:39 AM2021-01-20T04:39:09+5:302021-01-20T04:39:09+5:30
शिरवळ : घरगुती वादातून पतीने लोखंडी तवा डोक्यात घालून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी येथील एका ...
शिरवळ : घरगुती वादातून पतीने लोखंडी तवा डोक्यात घालून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी येथील एका गृहप्रकल्पामध्ये घडली. मंगल अशोक पांचाळ (वय ६०, सध्या, रा. धनगरवाडी, ता. खंडाळा, मूळ रा. अरुळे ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी पती अशोक याला शिरवळ पोलिसांनी अटक केली आहे.
शिरवळ पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अरुळे येथील हृषीकेश अशोक पांचाळ हे पुणे येथे नौकरीनिमित्त कुटुंबीयांसमवेत राहतात. हृषीकेश पांचाळ यांनी डिसेंबर २०२० रोजी धनगरवाडी, ता. खंडाळा येथील एका गृहप्रकल्पामध्ये घर खरेदी केले. १ जानेवारी २०२१ पासून वडील अशोक व आई मंगल पांचाळ येथे राहण्याकरिता आहे. हृषीकेश पांचाळ याने घरामध्ये घरगुती साहित्य भरून दिले होते. मात्र अशोक पांचाळ यांना व्यसन असल्याने घरामध्ये पूर्वीपासून वारंवार वादावादीचे प्रकार घडत होते. त्याचप्रमाणे वडील अशोक यांना संबंधित गृहप्रकल्पामध्ये आणल्याने नाराज होते. हृषीकेश त्यांची समजूत काढत होते. १३ जानेवारी रोजी हृषीकेश घरी आले असता आई मंगल यांनी अशोक पांचाळ यांनी धमकी दिल्याचे सांगितले. दरम्यान, मंगळवार दि. १९ रोजी अशोक व मंगल यांच्यामध्ये पूर्वीच्या घरगुती वादामधून भांडण झाले. त्यानंतर अशोक यांनी मुलगा हृषीकेश यांना दूरध्वनीद्वारे आई मंगल हिचा लोखंडी तवा घालून खून केल्याचे सांगितले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, शिरवळचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. हृषीकेश पांचाळ यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अशोक पांचाळ याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दखल करण्यात आला. अशोक पांचाळला अटक केली आहे.
चौकट
रक्ताच्या थारोळ्यात..
खुनानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तेथील परिस्थिती पाहून पोलीसही अवाक् झाले. यावेळी घरामध्ये साहित्य अस्ताव्यस्थ पडलेले होते, तर मंगल ह्या रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडलेल्या होत्या. यावेळी ज्या लोखंडी तव्याने अशोक पांचाळ याने खून केला तो मृतदेहाशेजारी हॅण्डल तुटलेल्या अवस्थेत पडलेला होता. विशेष म्हणजे अशोक त्यानंतर रक्ताने भरलेली कपडे बदलून काही झालेच नाही, असे वावरत होता.