म्युझिक थेरपी देतीये लढण्याचे बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 04:31 PM2020-05-31T16:31:12+5:302020-05-31T16:32:53+5:30
चंद्रकांत सणस म्हणाले, ‘गावात दोन ठिकाणी कर्णे लावण्यात आले आहेत. रोज सकाळी ७ ते ९ या वेळेत भक्तिगीते लावण्यात येतात. ग्रामस्थांची सकाळ सकारात्मक ऊर्जेने सुरू व्हावी, हा त्या मागचा उद्देश आहे. लॉकडाऊन काळात शारीरिक अंतर पाळून सलग तीन महिने घरांतच राहिलेल्या ग्रामस्थांना असं परस्परांपासून दूर राहणं आता
प्रगती जाधव-पाटील ।
सातारा : गावात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर ग्रामस्थांच्या मनावर असलेला ताण आणि घरातच राहून आलेली मरगळ दूर करण्यासाठी जकातवाडी ग्रामपंचायतीने म्युझिक थेरपी सुरू केली आहे. रोज सकाळी दोन तास स्फूर्ती देणारी भक्तिगीते लावून ग्रामस्थांच्यात चैतन्याचं वातावरण तयार करण्याचा ग्राम पंचायतीचा हा उपक्रम स्तुत्य आहे.
जकातवाडी गावात गत सप्ताहात पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर गावातील वातावरण गढूळ झाले होते. गावात सर्वांकडे जाऊन प्रबोधन करणं कोरोना काळात शक्य नसल्याने ग्रामस्थ समता जीवन यांनी म्युझिक थेरपीची संकल्पना ग्रामपंचायतीला सुचवली. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी ग्रामपंचायत सदस्यांनी अंमलबजावणी करून हा उपक्रम सुरू केला.
याविषयी बोलताना चंद्रकांत सणस म्हणाले, ‘गावात दोन ठिकाणी कर्णे लावण्यात आले आहेत. रोज सकाळी ७ ते ९ या वेळेत भक्तिगीते लावण्यात येतात. ग्रामस्थांची सकाळ सकारात्मक ऊर्जेने सुरू व्हावी, हा त्या मागचा उद्देश आहे.
लॉकडाऊन काळात शारीरिक अंतर पाळून सलग तीन महिने घरांतच राहिलेल्या ग्रामस्थांना असं परस्परांपासून दूर राहणं आता बोचायला लागलंय. कायम घरात राहून निर्माण होणारी नकारात्मक घालवेल, अशाच गाण्यांची निवड केली आहे.’उपक्रमासाठी सरपंच चंद्रकांत सणस यांना राजेश भोसले, योगेश शिंदे, सचिन जाधव, अमोल कांबळे, अनिल कांबळे यांची साथ लाभली.
ऊर्जा देणाऱ्या गाण्यांचीच होतेय निवड
मानसिक, शारीरिक आणि अध्यात्मिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी म्युझिक थेरपी उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. कोरोनामुळे ग्रामस्थांमध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी गाण्यांची सुयोग्य निवड करण्याची जबाबदारी उत्तम भोसले यांच्याकडे दिली आहे. रोज सकाळी ७ ते ९ यावेळेत गीते लावण्याचे काम महेश मोहिते करत आहे.
रोज सकाळी गाण्यांची मिळणारी ही मेजवानी दिवसाच्या चांगल्या सुरुवातीसाठी खूपच गरजेची आहे. या गीतांमुळे भविष्याविषयी सकारात्मकता निर्माण करण्याची अनोखी ऊर्जा मिळतेय.
- समता जीवन, सहायक प्राध्यापक, जकातवाडी
कोव्हिडचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर ग्रामस्थ हादरून गेले होते. सार्वजनिक आयुष्याची सवय असलेल्या ग्रामस्थांना घरात राहणंही जिकिरीचं आहे. या प्रयोगाचं अनेक स्तरांतून कौतुक होतंय.
- चंद्रकांत सणस, सरपंच, जकातवाडी