मराठा महामोर्चासाठी मुस्लीम बांधवांची वाहने
By admin | Published: September 30, 2016 01:21 AM2016-09-30T01:21:07+5:302016-09-30T01:25:58+5:30
शिरवळमध्ये बैठक : उद्योजकांकडून अल्पोपाहाराची सोय
शिरवळ : सातारा महामोर्चासाठी मुस्लीम समाजातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी वाहने कमी पडल्यास आपल्याकडील ट्रक उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. तसेच महामोर्चाकरिता उपस्थित राहणाऱ्या मोर्चेकऱ्यांकरिता उद्योजकांकडून अल्पोपाहाराची सोय केली आहे.
विशेष म्हणजे प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीने हिरीरीने व स्वयंस्फूर्तीने आपापल्यापरीने वाटा उचलत सातारा येथे सोमवार, दि. ३ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या ऐतिहासिक मराठा महामोर्चा यशस्वी करण्यासाठी शिरवळ बंदची हाक देत हजारो शिरवळकरांच्या उपस्थितीमध्ये महामोर्चामध्ये सहभागी होण्याचा शिरवळकरांनी निर्धार व्यक्त केला. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
सातारा या ठिकाणी मराठा समाज बांधवांच्या वतीने ऐतिहासिक मराठा महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिरवळ येथील दिवंगत तुकाराम कबुले सभागृह या ठिकाणी मराठा समाजबांधव यांच्या वतीने महामोर्चाकरिता नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी एक मराठा लाख मराठा, जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी हजारो शिरवळकरांनी नियोजन बैठकीकरिता उपस्थिती दर्शवत महामोर्चामध्ये शिरवळकर मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी प्रथमत: कोपर्डी येथील पीडितेला व जम्मू-काश्मीर येथील उरी या ठिकाणी दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित शिरवळकरांनी उत्स्फूर्तपणे आपले योगदान देत कोणी ट्रक, महाविद्यालयीन युवतींकरिता बसेस, चारचाकी वाहने, टेम्पो तसेच महामोर्चाकरिता शिरवळ परिसरात वाहने कमी पडल्यास प्रसंगी इतर जिल्ह्यांतून मोर्चाकरिता वाहने उपलब्ध करण्यात येणार आहे.
यावेळी तमाम शिरवळकरांनी मोर्चाकरिता शिरवळ परिसरातील औद्योगिक कंपन्यांना सुटी द्यावी, असे आवाहन केले आहे. यावेळी शिरवळ मुस्लीम समाज, माळी समाज, तिळवण तेली समाज, भटक्या विमुक्त समाज, कैकाडी समाज, मारवाडी, समाज बांधवांच्या वतीने व व्यापारी वर्ग यांनी मराठा क्रांती महामोर्चाला पाठिंबा व्यक्त करत महामोर्चामध्ये हिरीरीने सहभागी होणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, सोमवार, दि. ३ रोजी सातारा या ठिकाणी जाण्याकरिता शिरवळ ग्रामदैवत अंबिका मातेच्या मंदिरामध्ये येण्याचे व तेथून रॅलीद्वारे सातारा येथील महामोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी शिरवळ बंदची हाक देत हजारो शिरवळकर विविध समाजबांधव मराठा क्रांती महामोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)
सर्वच समाजांच्या एकजुटीचा प्रत्यय
विशेष म्हणजे प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीने हिरीरीने व स्वयंस्फूर्तीने आपापल्यापरीने वाटा उचलत मोर्चेकऱ्यांकरिता टोप्या, काळी रिबीन, वाहनांकरिता व महामोर्चामध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तींकरिता भगवे झेंडे, तसेच पाण्याचे बॉक्स उपलब्ध करण्याचा निर्धार व्यक्त करत मराठा समाजाच्या व इतर समाजाच्या एकजुटीचा प्रत्यय दिला आहे.