मिरवणुकीत वाद्य वाजविण्याचा मान मुस्लीम बांधवांना-शंभर वर्षांची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:26 AM2017-09-03T00:26:48+5:302017-09-03T00:27:36+5:30
सचिन काकडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : साताºयातील पाच मानाच्या गणपतींपैकी एक असलेल्या शंकर-पार्वती गणपतीला शंभर वर्षांची परंपरा आहे. अनंत चथुर्दशीला शहरातील सर्व घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतरच या मूर्तीचे विसर्जन केले जाते. महत्त्वाची बाब म्हणजे या गणपतीच्या मिरवणुकीत वाद्य वाजविण्याचा मान गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लीम बांधवांनाच दिला जातो. ही परंपरा आजही सुरू आहे.
शनिवार पेठेत राहणाºया राहुल परदेशी यांच्या कुटुंबीयाच्या वतीने दरवर्षी शंकर-पार्वती गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. मध्यभागी शंकर, उजव्या बाजूला श्री गणेश व डाव्या बाजूला पार्वती अशा रुपातील ही मूर्ती शाडू मातीपासून बनविली जाते. विशेष म्हणजे, राहुल परदेशी स्वत:च्या हाताने ही मूर्ती साकारतात. साताºयातील पाच मानाच्या गणपतींपैकी एक असलेल्या या गणेशाला शंभरहून अधिक वर्षांची परंपरा आहे. तिसºया पिढीतील राहुल परदेशी हे गेल्या २६ वर्षांपासून मूर्ती घडविण्याचे काम करीत आहेत.
अनंत चथुर्दशीला पारंपरिक पद्धतीने शंकर-पार्वती गणेशाची सवाद्य मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक अत्यंक साध्या पद्धतीने कोणताही डामडौल व गुलालाची उधळण न करता काढली जाते. मिरवणुकीत दोनच वाद्ये वाजविली जातात. ही वाद्ये वाजविण्याचा मान मुस्लीम बांधवांना दिला जातो. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे. मिरवणुकीत ‘गणपती बाप्पा मोरया’ऐवजी ‘शिव सांब हर-हर’ असा जयघोष केला जातो. विसर्जन मार्गात ठिकठिकाणी नागरिकांच्या वतीने मूर्तीचे स्वागत व पूजा केली जाते. शहरातील सर्व घरगुती व सार्वजनिक गणेशमंडळांच्या मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर सर्वात शेवटी शंकर-पार्वती गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते.
ना मंडळ.. ना ट्रस्ट
शंकर-पार्वती गणेश मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे या गणपतीचे कोणतेही मंडळ नाही अथवा ट्रस्ट नाही. गणेशोत्सवासाठी लोकवर्गणीही गोळा केली जात नाही. उत्सवासाठी येणारा सर्व खर्च परदेशी कुटुंबाच्या वतीने केला जातो. मानाचा गणपती असल्याने दर्शनासाठी उत्सवकाळात शहर व परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात.
शाडू मातीची मूर्ती
शनिवार पेठेतील राहुल परदेशी यांनी शाडू मातीपासून शंकर-पार्वती गणपतीची मूर्ती साकारली आहे. जेव्हा पासून या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेस प्रारंभ झाला, तेव्हापासून ही मूर्ती शाडूपासूनच बनवली जात आहे.
रंगकामासाठी प्रामुख्याने पोस्टर कलरचा वापर करण्यात येतो, अशी माहिती राहुल परदेशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.