मसूरकरांची मने जिंकली :
By admin | Published: October 24, 2016 12:40 AM2016-10-24T00:40:35+5:302016-10-24T00:40:35+5:30
मसूरकरांची मने जिंकली : अंध मुलांनी कलाविष्कारातून दिली सकारात्मक दृष्टी
मसूर : अंध मुलांच्या कलाविष्कारावर प्रभावीत होऊन व त्यांना प्रेरणा देण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून मसूर पोलिस आणि जय दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाने त्यांना अर्थिक मदतीचा हातभार देत माणुसकीचे अनोखे दर्शन घडविले. यावेळी अंध मुलांनी भावनिक साद घालत आणि जगण्यातील आत्मविश्वास दाखवत मसूरकरांची मने जिंकली.
दरम्यान, त्यांनी आम्ही अंध असून, खचत नाही. तुम्हाला दृष्टी, कष्टाचे हात आहेत. मग, आत्महत्या करताचं का? असा सवाल उपस्थित करून सर्वांना सकारात्मक दृष्टी देण्याचा प्रयत्न केला.
येथील जय दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळ, खडकपेठ या मंडळाने दृष्टिहीन मुलांना प्रेरणा देणारा अंध मुलांचा आॅर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंध मुलांनी दाखविलेला विविध कलाविष्कार विचार करणारा ठरला. या आॅर्केस्ट्रातील सर्व मुले अंध असतानाही त्यांनी सादर केलेल्या विविध कलांनी मसूरकरांची मने जिंकली. विशेष म्हणजे, या अंध मुलांनी सध्या भेडसावणाऱ्या शेतकरी आत्महत्या या ज्वलंत विषयावर केलेले प्रबोधनकार मार्गदर्शनांनी उपस्थित श्रोत्यांची मने हेलावली.
‘आम्ही अंध असून आम्हाला जग पाहता येत नाही, ही वस्तुस्थिती असली तरी जीवन जगण्याची उर्मी आम्हाला मिळते. आम्ही अंध असूनही जगण्याची धडपड करतो, खचत नाही. तुम्हाला दृष्टी आहे, कष्टाचे हात आहेत. मग तुम्ही आत्महत्या करताच का? असा डोळस लोकांच्यापुढे झणझणीत अंजनाचा सवाल त्यांनी उपस्थित केला. देवाने दिलेल्या सुंदर आयुष्याचा मनमुराद आनंद लुटा, आयुष्य खूप सुंदर आहे, ते जगायला शिका,’ असा सल्लाही त्यांनी दिला.
सहायक पोलिस निरीक्षक देशमुख, एस. जी. घाडगे, अभिजित भादुले, एफ. एच. शेख, रवींद्र पवार, नरेश माने, प्रकाश जाधव, विजय पवार, पवन निकम, जितेंद्र घाडगे, अधिक निकम, नंदकुमार नलवडे, हणमंत जाधव, संजय निकम, संभाजी बर्गे, संजय जाधव, धनंजय महाजन, सुनील शहा उपस्थित होते. (वार्ताहर)
भविष्यात जगण्याची प्रेरणा मिळेल...
यावेळी अंध मुलांच्या कलाविष्कारांनी प्रभावीत होऊन मसूर पोलिस दूरक्षेत्रचे सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी व जय दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिळून त्यांना १६ हजारांची अर्थिक मदत केली. यावेळी मसूरकरांचीही मदत स्वीकारताना आम्हाला भविष्यात जगण्याची आशा व प्रेरणा मिळेल अशा प्रतिक्रिया अंध मुलांनी व्यक्त केली.