...मिशा काढव्याच लागणार

By admin | Published: January 22, 2017 11:47 PM2017-01-22T23:47:43+5:302017-01-22T23:47:43+5:30

शिवेंद्र्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला : जमिनी लाटणारेच जनतेला सर्वस्व मानत आहेत

... Mustache has to be removed | ...मिशा काढव्याच लागणार

...मिशा काढव्याच लागणार

Next



सातारा : जी. जी. कदम यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात बोलबच्चनगिरी करणाऱ्या उदयनराजेंना जनाची नाही निदान मनाची तरी लाज वाटायला हवी होती. सत्येच्या हव्यासापोटी तत्कालीन सातारा-जावळी बाजार समितीच्या निवडणुकीत ज्या जी. जी. कदमांच्या विरोधात पॅनेल टाकले, आज त्याच जी. जी. कदमांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात अमित कदम यांना आमदार करणारच, अशी वल्गना खासदारांनी केली. आमदारकीचे सोडाच; खासदारकीच्या निवडणुकीनंतर तुम्हाला मिशा आणि भुवया सुद्धा काढाव्याच लागणार आहेत,’ असा सणसणीत टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे यांना लगावला.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अनेकांच्या गुपचूप भेटीगाठी घेऊन डाळ शिजवण्याचा प्रयत्न करणारे उदयनराजे एकीकडे मी राष्ट्रवादीबरोबरच असल्याचे दाखवत आहेत. जे काय करायचे ते उघडपणे करायला घाबरायचे कशासाठी? तुम्हाला आमदार करतो म्हणून सदाशिव सपकाळ यांना घेऊन फिरायचे, दुसरीकडे अमित कदमांना आमदार करण्यासाठी मिशा पणाला लावायच्या तर तिसरीकडे भाजपाच्या दीपक पवारांसोबत चर्चा करायची. तुम्ही कोणाकोणाला आमदार करणार आहात, हे एकदा उघडपणे सांगा. ज्यांना आमदार व्हायचंय त्यांना तरी कळू द्या. आमदारकीचे सोडाच; पण त्यापूर्वी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर तुम्हाला नक्कीच मिशा काढाव्या लागणार आहेत. त्यामुळे आधीच बारीक केलेल्या मिशा जरा वाढवा,’ असा उपरोधिक टोलाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावला.
गेल्या आठ वर्षांत जावळीसाठी तुम्ही किती वेळ दिला? विकासकामाचे सोडाच; पण गेल्या आठ वर्षांत तुम्ही जावळीत किती वेळा फिरकला? जावळीकरांना तुमचे दर्शन कधी झाले? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे तुम्हाला आता दारोदार भटकावे लागत आहे, हे न समजण्याइतपत जनता खुळी नाही.
कोणीही विश्वास ठेवायला तयार नसल्याने ‘ना घर का ना घाट का’ अशी केविलवाणी अवस्था उदयनराजेंची झाली आहे. ज्या लोकांच्या जमिनी लाटल्या, ज्यांना देशोधडीला लावले त्याच जावळीकरांचा पुळका तुम्हाला आता का आला? निवडणुकीनंतर सातबारा कोरा करणार, अशी घोषणा करणाऱ्या उदयनराजेंनी कोणत्या निवडणुकीनंतर हे सत्कर्म करणार आहे, ते का
जाहीर केले नाही? असा परखड सवालही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला. (प्रतिनिधी)

येईल त्या मंत्र्यांपुढे पायघड्या..
खासदारकीच्या आधी तुम्ही कोण होता? शरद पवार आणि राष्ट्रवादीमुळे तुम्ही खासदार झाला हे विसरू नका. आपणच जनतेचे कैवारी आणि आपणच जिल्ह्याचे नेते अशी स्वप्ने उदयनराजेंना स्वस्थ बसू देत नसल्याचे दिसत आहे. काहीही करून जिल्हा परिषदेत सत्ता मिळवायची म्हणून उदयनराजे येईल त्या मंत्र्यांच्यापुढे पायघड्या घालत आहेत. गद्दारीमुळे राष्ट्रवादी पक्षाने खड्यासारखे बाजूला केल्याने आता त्यांची पळता भुई थोडी झाली आहे, असेही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
हिम्मल असेल तर सातबारा कोरा करा
गोरगरीब आणि कष्टकरी जनतेच्या जमिनीवर स्वत:च्या नावाचे शिक्के मारले. त्यांच्या जमिनी परस्पर विकल्या आणि स्वत:ची तुंबडी भरली. सातबारा कोरा करण्याचे सोडा; पण आजवर कधीही याबाबत एक अवाक्षरही न काढणारे उदयनराजे निवडणुकीनंतर सातबारा कोरा करणार असल्याचे सांगत आहेत. वाघ, मांजर सोडा; थोडीशी माणुसकी दाखवा आणि हिम्मत असेल तर, लोकांचे सातबारे कोरे करा,’ असे खुले आव्हान आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजेंना दिले.
वाघ की मांजर हे
तुम्हाला दाखवून देऊ ...
खा. उदयनराजे यांच्या वाघ आणि मांजर या वक्तव्याचा जोरदार समाचार घेत शिंवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘वाघ, मांजर उल्लेख करणे हे तुमच्यासारख्या हिंस्त्र व्यक्तीलाच शोभते. आम्ही माणूस आहोत आणि कायमस्वरुपी माणूसच राहणार. विधानसभा निवडणुकीवेळी तुमच्या विरोधात निवडणूक लढवून तुम्हाला पराभूत केले आहे, हे विसरला का? मी वाघ आहे का कोण? हे त्यावेळीच तुम्हाला दाखवले आहे आणि यापुढेही दाखवून देऊ.’

Web Title: ... Mustache has to be removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.