गोवारेत ‘माझे मूल, माझी जबाबदारी’ कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:25 AM2021-06-29T04:25:37+5:302021-06-29T04:25:37+5:30
कऱ्हाड : गोवारे (ता. कऱ्हाड) येथे ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझे मूल, माझी ...
कऱ्हाड : गोवारे (ता. कऱ्हाड) येथे ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझे मूल, माझी जबाबदारी’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्यसेविका एच. आर. गोतपागर यांनी स्त्रियांचे आरोग्य मुलांची काळजी, कोरोना काळातील इतर आजार, म्युकरमायकोसिस, गर्भवती महिलांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कोरोना लक्षणे असणाऱ्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. यावेळी सरपंच वैभव बोराटे, उपसरपंच विजय पाटील, सुनीता थोरात, एस. बी. देशमुख, विजया सुर्वे, अनिल तुपे, आदी उपस्थित होते.
‘एक घरटे पक्ष्यांसाठी’ स्पर्धेचे आयोजन
कऱ्हाड : येथील प्रज्ञा एंटरप्राइजेस व कोल्हापूर येथील यूआरसीडी या सामाजिक संस्थेच्यावतीने ‘एक घरटे पक्ष्यांसाठी’ ही अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धकांनी घरातील टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ असे घरटे बनवायचे आहे. स्पर्धेसाठी एक लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. विशेष घरटे बनविणाऱ्या उत्कृष्ठ निवडक घरट्यांसाठी इलेक्ट्रिक सायकल बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेचा निकाल २३ जुलै रोजी वनसंवर्धन दिनी जाहीर केला जाणार आहे. स्पर्धकांनी तयार केलेले घरटे १५ जुलैपर्यंत जमा करायचे आहे. तसेच सर्व स्पर्धकांनी किमान एक हजार सीडबॉल तयार करणे आवश्यक आहे.
सणबुरला दहावीतील गुणवंतांचा गौरव
सणबूर : येथील दीपकराव शंकरराव जाधव यांची कन्या दिवंगत सायली दीपकराव जाधव हिच्या स्मरणार्थ जाधव कुटुंबीयांच्यावतीने दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. सणबूर येथील महात्मा गांधी विद्यालयात हा कार्यक्रम झाला. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षेत अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावलेल्या लक्ष्मी साळुंखे, पल्लवी निकम, सुजाता जाधव यांना यावेळी गौरविण्यात आले. कार्यक्रमाला उपसरपंच संदीप जाधव, मुख्याध्यापक तानाजी कांबळे, ग्रामपंचायत सदस्य संदीपराव जाधव, सुनील देसाई, विकास जाधव, भरत कुंभार, आनंद शिंदे, शुभांगी जाधव, प्रभावती शिंदे, दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.