CoronaVirus In Satara : माझे मूल माझे जबाबदारी योजनेचा शुक्रवारी प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 06:08 PM2021-06-08T18:08:47+5:302021-06-08T18:10:20+5:30
CoronaVirus In Satara : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजना यश येत असून नागरिकांनी जर नियम पाळले तर रुग्ण संख्या कमी होईल. जिल्ह्यात अजून जे निर्बंध लागू आहेत ते देखील उठण्याच्या बाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. परंतु लोकांनी त्यासाठी सजग असणे गरजेचे आहे. आता दर शुक्रवारी परिस्थिती बघून आदेश काढले जातील असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
सातारा : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजना यश येत असून नागरिकांनी जर नियम पाळले तर रुग्ण संख्या कमी होईल. जिल्ह्यात अजून जे निर्बंध लागू आहेत ते देखील उठण्याच्या बाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. परंतु लोकांनी त्यासाठी सजग असणे गरजेचे आहे. आता दर शुक्रवारी परिस्थिती बघून आदेश काढले जातील असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
सातारा जिल्ह्यात करोना संक्रमणाची घटलेली टक्केवारी ही नैसर्गिक आहे. जिल्हा विशेष समितीच्या बैठकीत शनिवार ते शुक्रवार अशी आकडेवारी संकलित करून जिल्ह्याच्या संक्रमणाची प्रतवारी निश्चित होणार आहे . तिसऱ्या लाटेचे संक्रमण उद्भवू नये यासाठी सातारकरांनी करोना प्रतिबंधक नियमाचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संक्रमणाचा लहान मुलांना त्रास होवू नये याकरिता सातारा कराड फलटण वाई या चार तालुक्यात लहान मुलांसाठी तीस ऑक्सीजन बेडची विशेष रुग्णालये उभारली जात आहेत . यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत माझे मूल माझी जवाबदारी या योजनेचा शुभारंभ येत्या शुक्रवारपासून येथील नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे शेखरसिंह यांनी स्पष्ट केले .
सातारा जिल्ह्यात करोना संक्रमण प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देताना जिल्हाधिकारी शेखरसिंह पुढे म्हणाले, करोनाचा संसर्ग आटोक्यात ठेवणे ही सातारा जिल्हावासियांची जवाबदारी आहे . जिल्ह्यात संकमणाची टक्केवारी सध्या ९.७५ टक्के असून ती पूर्णतः नैसर्गिक आहे .
सर्व आरोग्य यंत्रणेकडून येणाऱ्या आकडेवारीचे काटेकोर संकलन केले जात आहे . जिल्हा विशेष समितीच्या बैठकीत दर आठवड्याला शनिवार ते शुकवार अशा आकडेवारीचे शास्त्रीय संकलन करून संक्रमणाची टक्केवारी निश्चित केली जाणार आहे .सातारकरांनी करोनाची तिसरी लाट उद्भवू नये याकरिता सामाईक अंतर राखणे, विनाकारण गर्दी न करणे या उपाययोजनांचे कठोरपणे पालन करणे गरजेचे आहे .
लसीकरणा संदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले जिल्ह्यात ७ लाख ६९ हजार ५८१ लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला असून जिल्हयात एकूण ५६ टक्के लसीकरण झाले आहे. केंद्र शासनाच्या सुधारीत आदेशाप्रमाणे खाजगी दवाखान्यांमध्ये सुध्दा दीडशे रूपयांच्या नाममात्र शुल्कात लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
याशिवाय तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात आयसीयू व ऑक्सीजन बेडची क्षमता पाच हजारापर्यंत वाढविणे, जिल्ह्याची ४८ मेट्रिक टन ऑक्सीजनची पूर्तता करणारे ऑक्सीजन प्लॅन्ट उभारणे, कॉन्स्ट्रेटरचा मुबलक पुरवठा ठेवणे, इ उपाययोजना युद्ध पातळीवर राबविले जात असून बालरोगतज्ञांच्या टास्कफोर्सच्या सूचनेप्रमाणे ० ते २ बालकांसाठी मास्क न वापरणे, २ ते ५ वयोगटाच्या बालकांना मास्क वापरण्यासाठी प्रवृत्त करणे, व ५ वर्षापुढील बालकांना मास्कची सक्ती करणे ही नीती अवलंबिली जाणार असून त्या पध्दतीने पालकांना समुपदेशन करणाऱ्या चित्रफिती प्रदर्शित केल्या जाणार आहेत . बालकांची विशेष हॉस्पिटल्स ही अंगणवाडीच्या धर्तीवर विकसित करताना येथील वातावरण हलकेफुलके ठेवणेकरिता बालरोगतज्ञांचा विशेष सल्ला घेतला जाणार आहे .