जावई माझा भला; त्याच्या प्रचाराला चला!

By admin | Published: October 6, 2014 10:04 PM2014-10-06T22:04:32+5:302014-10-06T22:40:51+5:30

निवडणूक प्रचार : अनेक उमेदवारांच्या सासुरवाडीहून आली कार्यकर्त्यांची फौज

My son is good; Come to his preaching! | जावई माझा भला; त्याच्या प्रचाराला चला!

जावई माझा भला; त्याच्या प्रचाराला चला!

Next

मोहन मस्कर-पाटील -सातारा -आपल्या गावचा ‘जावई’ आमदार झालाच पाहिजे यासाठी ‘सासुरवाडी’ही सज्ज झाली आहे. लाडक्या जावयाच्या प्रचारार्थ सर्वच मतदारसंघात सासुरवाडीकरांची फौज प्रचारार्थ दाखल झाली आहे. विशेष म्हणजे उमेदवारांच्या ‘सौभाग्यवती’ माहेरच्या मंडळींशी संपर्क साधून मतदारसंघात कोणत्या गावात पाहुणे अथवा गावातीलच कोणाचा मित्रपरिवार आहे का, याची माहिती घेत आहेत.
कोणत्याही निवडणुकीत पै-पाहुण्यांना राजकीय महत्त्व प्राप्त होते. ज्याच्या पारड्यात साठ हजार मते त्याच्याच गळ्यात विजयाची माळ पडणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे एक-एक मत ‘लाख’मोलाचे आहे. परिणामी विधानसभा निवडणूकही त्याला अपवाद ठरलेली नाही. मतांच्या गणितात कधीही महत्त्व न मिळालेल्या पाहुण्यांचा भाव चांगलाच वधारला आहे. उमेदवार आणि त्यांचे समर्थक एकमेकांचे नातेवाईक शोधत असून जर कोणी असलेच तर त्या कुटुंबाची तत्काळ भेट घेतली जात आहे आणि मतदानासाठी आग्रह केला जात आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात ८७ उमेदवार रिंगणात असून प्रत्येक ठिकाणची लढत आता चुरशीची बनली आहे. आमदार होण्याचे स्वप्न बाळगणारे प्रत्येकजण मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी सर्व अस्त्रांचा वापर करण्यात येत आहे. ‘पाहुण्यांचा पाहुणा’, ‘मित्रांचा मित्र, ‘पाहुणीची पाहुणी’, ‘शेजाऱ्याचा पाहुणा-आपला पाहुणा’ या सूत्रांची अमंलबजावणी उमेदवार करू लागले आहेत. उमेदवारांची सासुरवाडी त्यापैकीच एक सूत्र आहे. अनेक उमेदवारांच्या प्रचाराची सर्व जबाबदारी मेहुण्यांच्यावर आहे. अनेक उमेदवारांची सासुरवाडी जिल्ह्याबाहेर असली तरी येथून पै-पाहुणे मतदारसंघात दाखल झाले आहेत. एका नेत्यांने आपल्या लाडक्या जावयासाठी तर दुसऱ्या एका मेहुण्याने आपल्या दाजींसाठी पैलवानांची फौज पाठविली आहे. ‘सातारा-जावळी’चे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे यांची ‘आसू’ तर दगडू सकपाळ यांची सासुरवाडी ‘लिंब’ आहे. लिंब याच मतदारसंघात असल्यामुळे येथील नेतेमंडळी आपण ज्याचे नेतृत्व मानतो त्या नेत्याचा प्रचार करावयाचा, की आपल्या गावच्या जावयाचा, अशा द्विधावस्थेत आहेत.

एकीकडे भाऊजी अन् दुसरीकडे पक्ष...
‘कऱ्हाड दक्षिण’चे भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे जावई आहेत. डॉ. भोसले यांनी ज्यावेळी विधानसभा लढण्याचा निर्णय घेतला त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते आणि तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडणुकीस उभे राहतील, अशी शक्यता नव्हती. परिणामी डॉ. भोसले यांनी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले होते. विशेष म्हणजे ‘कऱ्हाड दक्षिण’मध्ये स्वत: चित्रपट अभिनेता रितेश देशमुख काही दिवस तळ ठोकून भोसले यांच्या प्रचाराची सूत्रे सांभाळणार होते. मात्र, चव्हाणांचे दौरे वाढले आणि ते लढणार असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर डॉ. भोसले यांनी थेट चव्हाणांवरच हल्लाबोल केला. काही दिवसांतच काँग्रेसकडून ‘कऱ्हाड दक्षिण’मधून पृथवीराज चव्हाण तर तिकडे ‘लातूर’मधून रितेशचे भाऊ अमित देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाली. परिणामी रितेश यांना त्यांची ‘कऱ्हाड दक्षिण’ची वारी रद्द करावी लागली. अमित यांना उमेदवारी मिळाल्यामुळे, इच्छा असतानाही भाऊजींच्या प्रचारासाठी त्यांना येता न आल्याची खंत कायमचीच मनाला लागून गेली.

सासरची मंडळी प्रचाराला येतच नाहीत...
विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या कुटुंबातील अथवा त्यांचे नातेवाईक, सासुरवाडीची मंडळी कधीही प्रचारात दिसली नाहीत. आजअखेर त्यांनी हे कटाक्षाने पाळले आहे. मकरंद पाटील यांची सासुरवाडी कल्याण तर धैर्यशील कदम यांची धोम, रणजितसिंह देशमुख यांची श्रीरामपूर, दीपक चव्हाण यांची सासुरवाडी फुरसुंगी आहे. येथूनही कोणीही प्रचाराला आले नसल्याचे या मंडळींकडून सांगण्यात आले.
 

मिरजकर जावयांमध्ये रंगले राजकीय युध्द
संपूर्ण महाराष्ट्रात ‘कऱ्हाड दक्षिण’ची लढत लक्षवेधी ठरली आहे. राजकीय विक्रमाच्या वाटेवर असलेल्या विलासराव पाटील-उंडाळकरांना रोखण्यासाठी मैदानात उतरलेले पृथ्वीराज चव्हाण त्याचबरोबर डॉ. अतुल भोसले यांच्यासाठी भाजपने केलेली प्रतिष्ठेची लढत यामुळे राजकीय विश्लेषकांच्या नजरा या मतदारसंघाकडे लागल्या आहेत. ‘कऱ्हाड दक्षिण’च्या लढतीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे विलासराव पाटील-उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण हे दोघेही ‘मिरजकर जावई’ आहेत. उंडाळकरांची सासुरवाडी डिग्रज तर चव्हाणांची सासुरवाडी मिरज आहे. विशेष म्हणजे दोन्ही गावे मिरज तालुक्यात येत असल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात यावेळी एकाच तालुक्यातील दोन जावयांचे राजकीय युध्द आता राज्याच्या नजरेत भरले आहे.

Web Title: My son is good; Come to his preaching!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.