अजित पवारांसारखे माझे काका मुख्यमंत्री नव्हते--विनोद तावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 07:26 PM2017-09-22T19:26:39+5:302017-09-22T19:28:00+5:30
सातारा : ‘मी गरीब घरातील मुलगा होतो, त्यामुळे मोठ्या व नावाजलेल्या शिक्षण संस्थेत मी शिकू शकलो नाही.
सातारा : ‘मी गरीब घरातील मुलगा होतो, त्यामुळे मोठ्या व नावाजलेल्या शिक्षण संस्थेत मी शिकू शकलो नाही. माझे काका काही मुख्यमंत्री नव्हते,’ अशी कोपरखळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मारली.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने साताºयात आल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी मंत्री तावडे यांच्यावर टीका केली होती. ‘एका बोगस शिक्षण संस्थेची डीग्री घेऊन मंत्री तावडे शिकले. अशा लोकांकडे राज्याचे शिक्षण खाते आहे,’ असे ते म्हणाले होते. याबाबत पत्रकारांनी छेडले असता तावडे म्हणाले, ‘मी गरीब घरातील होतो. त्यामुळे माझ्या आई-वडिलांना परवडेल तिथे शिक्षण घेणे माझ्यासाठी भाग होते. माझे काका काय मुख्यमंत्री नव्हते. तसे असते तर मी नामांकित डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेत शिकलो असतो. अजित पवार यांनी माझ्यावर अशी टीका करून गरिबीचीच थट्टा केली आहे.’ ज्ञानेश्वरी विद्यापीठात आपल्या गुणांच्या आधारावर प्रवेश मिळाला होता. बोगस डीग्रीचा प्रश्नच येथे उद्भवत नाही.’
दिव्यांग मुलांच्या शिक्षणाबाबत शासन उदासीन का आहे? या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री तावडे म्हणाले, ‘दिव्यांग मुले सामान्य मुलांप्रमाणेच शिकावीत, असा शासनाचा हेतू आहे. इतर मुलांप्रमाणेच त्यांच्या क्षमता विकसित होऊ शकतील, यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांची नेमणूक करण्यात येत आहे. प्राथमिक किंवा माध्यमिक शाळांमध्ये विशेष शिक्षकांची नेमणूक करून त्यांच्यामार्फत या मुलांना शिक्षण देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.’
जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची वैधता तपासणी करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. अनेक शाळा वर्षानुवर्षे वातावरणाचा परिणाम झेलत उभ्या आहेत. अशा शाळांची दुरुस्ती अथवा त्या नव्याने बांधण्यात येतील. मात्र, अवघ्या एक-दोन वर्षांत कमी प्रतिचे बांधकाम साहित्य वापरून उभारण्यात आलेल्या शाळांचा प्रश्नही गंभीर आहे. अशा शाळा उभारणाºयांवर कारवाईचा इशाराही मंत्री तावडे यांनी दिला.
ज्ञानरचनावादाचे कौतुक
साताºयातून सुरू झालेला ज्ञानरचनवादाचा प्रकल्प राज्याने स्वीकारला आहे. याची गुणवत्ता सर्र्वांनाच पाहायला मिळते आहे. प्रत्येक तालुक्यासाठी क्रीडा अधिकारी नेमण्यात येणार असल्याचेही मंत्री तावडे यांनी स्पष्ट केले.