तीन सख्ख्या बहिणींच्या मृत्यूचे गुढ उकलणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:37 AM2021-02-14T04:37:49+5:302021-02-14T04:37:49+5:30
सैदापूर येथील आयुषी शिवानंद सासवे (वय ३ वर्षे), आरुषी शिवानंद सासवे (८), आस्था शिवानंद सासवे (९) या तीन सख्ख्या ...
सैदापूर येथील आयुषी शिवानंद सासवे (वय ३ वर्षे), आरुषी शिवानंद सासवे (८), आस्था शिवानंद सासवे (९) या तीन सख्ख्या बहिणींचा डिसेंबर २०२० मध्ये अचानक मृत्यू झाला. हा मृत्यू संशयास्पद होता. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी या कुटुंबातील सर्वांनी एकत्रीत जेवण केले होते. त्यानंतर रात्री सर्वजण झोपी गेले. मध्यरात्री शिवानंद यांच्या पत्नीसह तिन्ही मुलींना उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना सैदापुरातील खासगी डॉक्टरांकडे नेले. त्याठिकाणी डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून औषधे दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चौघींची प्रकृती स्थिर होती. मात्र, बुधवारी, दि. १६ पहाटे आयुषी, आरुषी व आस्था या तिघींची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यांना उलट्या झाल्या. त्यामुळे तिघींना कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आस्था आणि आयुषी या दोघींचा त्याचदिवशी मृत्यू झाला, तर आरुषीचा तीन दिवसांनी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यू झालेल्या तिन्ही मुलींचा व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता.
पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, पोलीस निरीक्षक राहुल वरुटे या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत. त्यातच तपासणीचा अहवालही पोलिसांना प्राप्त झाल्यामुळे तपासाला गती आली असून, अहवालाबाबत पोलिसांनी गोपनियता पाळली आहे.