परप्रांतीय कामगाराच्या खुनाचे गूढ उलगडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:34 PM2019-09-28T12:34:48+5:302019-09-28T12:36:09+5:30
अलगुडेवाडी, ता. फलटण हद्दीत असणाऱ्या महाराष्ट्र फूडस प्रोसेसिंग अॅण्ड कोल्ड स्टोरेज या कंपनीतील परप्रांतीय कामगाराच्या खुनाचे गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आले. पैशाच्या कारणातून निर्घृण खून झाल्याचे समोर आले असून, पोलिसांनी कंपनीतीलच कामगार नुरजमाल मोजीबार रोहमन (रा. हातीपोटा, राज्य आसाम) याला अटक केली आहे.
सातारा : अलगुडेवाडी, ता. फलटण हद्दीत असणाऱ्या महाराष्ट्र फूडस प्रोसेसिंग अॅण्ड कोल्ड स्टोरेज या कंपनीतील परप्रांतीय कामगाराच्या खुनाचे गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आले. पैशाच्या कारणातून निर्घृण खून झाल्याचे समोर आले असून, पोलिसांनी कंपनीतीलच कामगार नुरजमाल मोजीबार रोहमन (रा. हातीपोटा, राज्य आसाम) याला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सोमेर सोहेबराव अली (वय २७, मूळ रा. फौजदारचर, ता. चाफर, राज्य आसाम) हा कामगार गेल्या काही वर्षांपासून अलगुडेवाडी येथील कंपनीत कामाला होता. दरम्यान, सोमेर याच्यावर दि. २५ रोजी अज्ञाताने धारदार शस्त्राने वार करुन त्याचा मृतदेह चिलरमध्ये टाकला होता.
बुधवारी पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर फलटण शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घऊन मृतदेहाचा पंचनामा केला होता. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी फलटण येथे तळ ठोकून फलटण शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर एलसीबी व फलटण पोलीस यांच्या संयुक्त पथकांनी मृत व संशयितांच्या कामाच्या वेळा, वैयक्तीक संबंध याची माहिती इतर कामगारांकडून घेतली.
सुमारे दोनशे कामगारांकडे पोलिसांनी चौकशी केली. मात्र, काहीच धागेदोरे हाती लागत नव्हते. अखेर पोलिसांनी नुरजमाल याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने आपणच पैशाच्या कारणातून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यामुळे या खुनाचा उलगडा झाला. मयत सोमेर अली आणि आरोपी नुरजमाल रोहमन हे दोघे सांगली येथेही एकत्र काम करत होते. तसेच ते एकाच गावचे आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
आरोपी नुरजाल रोहमन याला न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पोमण हे करत आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, फलटणचे पोलीस उपनिरीक्षक एस. ए. बनकर, हवालदार रत्नसिंह सोनवलकर, उत्तम दबडे, सर्जेराव सूळ, रवींद्र वाघमारे,विक्रम पिसाळ, विशाल पवार, विजय सावंत, शरद तांबे यांनी केली.