नगराध्यक्षपदासाठी आत्तापासूनच डाव-प्रतिडाव!

By admin | Published: November 14, 2016 09:11 PM2016-11-14T21:11:44+5:302016-11-14T21:11:44+5:30

वडूजला रंगत वाढली : प्रभाग ६ व ७ मध्ये राजकारण घडतंय बिघडतंय; राजकीय नेत्यांचेही लक्ष - वडूज मोर्चेबांधणी

Nagarapataca post-right for today! | नगराध्यक्षपदासाठी आत्तापासूनच डाव-प्रतिडाव!

नगराध्यक्षपदासाठी आत्तापासूनच डाव-प्रतिडाव!

Next

वडूज : येथील जुनी मुख्य बाजारपेठ असणाऱ्या भागाची प्रभाग ६ व ७ मध्ये दुफळी झाली असली तरी खऱ्या अर्थाने या ठिकाणचे भावी नगरसेवकच नगराध्यक्षपदाचे सध्य:स्थितीत तरी प्रमुख दावेदार ठरणार आहेत. त्यामुळे संपूर्ण वडूज नगरीसह मुरब्बी राजकीय नेत्यांचे या दोन्ही प्रभागांकडे बारकाईने लक्ष आहे. या प्रभागात डाव-प्रतिडाव या राजकीय आयुधांसह सर्वच पर्यायांचा वापर होताना दिसून येत आहे.
दरम्यान, या दोन्ही प्रभागांत सध्या शह-काटशहाचे जोरदार राजकारण सुरू आहे. बरीच राजकीय स्थित्यंतरे घडल्याने प्रसंगी वेगळ्या वळणाचे राजकारण निर्माण झाले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, अशीच स्थिती या दोन्ही प्रभागांत दिसून येत
आहे.
खटाव तालुक्याच्या राजकीय पटलावर प्रभावी ठरलेले सुरेंद्र गुदगे यांची राजकीय खेळी यावेळी राष्ट्रवादी पक्षाला तारणार ठरतेय की काय? अशी अवस्था नगरपंचायत निवडणुकीदरम्यान स्पष्ट होत आहे. पक्षाचे तिकीट वाटप प्रक्रियेपासून ठाण मांडून बसलेले गुदगे यांचे राजकीय डावपेच वडूजकरांना नवीन नाहीत. सत्तेच्या बलाबलमध्ये अपुऱ्या संख्येवरही सोमनाथ येवले यांना सरपंच पद देऊन त्यांनी ‘दे-धक्का’ हा राजकीय डाव दाखवून दिलेला
होता. प्रभाग सहामध्ये लिंगायत समाजाची एकी करण्याबरोबरच गुदगे यांनी राष्ट्रवादी पक्षाला नवीन चेहरा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यादृष्टीने त्यांनी उमेदवारीसाठी भाजपच्या रांगेत असणाऱ्या अशोकराव गाढवे यांच्या गळ्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारीची माळ घातली.
कोणताही धोका न स्वीकारण्याची त्यांची ही खेळी या ठिकाणी बेरीज मारून गेली. मात्र, प्रत्येक वेळेस राजकारणात आपण ठरवतो अशीच बेरीज होतेच अशी नाही. त्यामुळे गाढवे यांची उमेदवारी न रुचल्याने मायणी अर्बनचे माजी संचालक असणाऱ्या विजय ऊर्फ बापू शेटे यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवार जाहीर केली. तर गुदगे यांची कायम सावलीसारखे पाठराखण करणारे विजय पांडुरंग शेटे यांनीही अपक्ष उमेदवारी करत निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतली आहे. त्यातच लिंगायत तेली समाजातील सामाजिक कार्यकर्ते महेश रघुनाथ खडके यांनीही मैदानात उडी घेतली आहे. या एकीकरणात गुदगे गटाला नेमके काय प्राप्त झाले ते निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
लिंगायत समाजाप्रमाणेच बहुसंख्य असणाऱ्या मुस्लीम समाजातही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या समाजातील जैनुद्दीन ऊर्फ मुन्ना मुल्ला यांना राष्ट्रीय काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.
मात्र, समाजातील दाऊदखान मुल्ला, मुसा ऊर्फबाकुभाई मुल्ला यांनी बंडखोरी करून मुन्ना मुल्ला यांच्यापुढे एक तगडे आव्हान उभे केले आहे. अशा स्थितीत माजी सरपंच अनिल माळी यांचे प्रयत्न कितपत यशस्वी ठरतायत हे येणारा काळच ठरविणार आहे. किरण नवगण-लोहार यांनी अपक्ष उमेदवारी करून अनिल माळी यांच्या हक्काच्या मतामध्ये फूट पाडली आहे.
नेहमीच सामाजिक कार्यात असणारे विशाल महामुनी यांना माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर आणि भाजप तालुकाध्यक्ष विकल्प शहा यांनी भाजपची उमेदवारी देऊन एक नवा चेहरा आणि वंचित समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला होता.
नेमकी माशी कोेठे शिंकली हे न समजताच महामुनी यांनी रणांगणातून माघार घेतली. काँग्रेसचे महेश गुरव, राष्ट्रवादीचे विजय काळे यांच्यासह अपक्ष सचिन प्रतापराव काळे मैदानात उतरल्याने या ठिकाणी लक्षवेधी तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीतील दोन्ही उमेदवारांना अपक्षाचे एक नवे तगडे आव्हान सामोरे आल्याने आणि तिघेही एकेकाळी दोस्तीतील असल्यामुळे या प्रभागातील प्रचारात रंगत येणार यात तिळमात्र शंका नाही. (प्रतिनिधी)



उमेदवार समर्थकांचे गनिमी कावे...
निवडणुकीनंतरच नगराध्यक्षपदी कोण? हे जरी ठरणार असले तरी आत्तापासूनच या पदासाठी जोरदार हालचाली आणि राजकीय आयुधांचा सर्रास वापर होताना दिसून येत आहे. प्रभाग सहा आणि सातमध्ये संभाव्य नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले असले तरी इतर प्रभागांतील नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवार समर्थकांचे गनिमी कावे या दोन्ही प्रभागांत सुरू असल्याचे दिसून येत आहेत.

Web Title: Nagarapataca post-right for today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.