अनेक वर्षांपासून नाल्यांची सफाईच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:41 AM2021-01-13T05:41:14+5:302021-01-13T05:41:14+5:30
मलकापूर : कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याच्या दुतर्फा बांधलेल्या आरसीसी नाल्यांची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. याचे सर्वाधिकार याच विभागाकडे ...
मलकापूर : कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याच्या दुतर्फा बांधलेल्या आरसीसी नाल्यांची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. याचे सर्वाधिकार याच विभागाकडे आहेत. मात्र, नाले निर्मितीपासून एकदाही या नाल्यांची साफसफाई केलेली नाही. त्यामुळे या परिसरात अनेक ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही ठिकाणी दगड, माती व कचऱ्यामुळे नाले तुंबले आहेत. तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झुडुपे वाढली आहेत. डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने नाल्यांची सफाई करणे गरजेचे आहे.
कऱ्हाडात भरधाव वाहनांवर कारवाई
कऱ्हाड : वाहनधारकांनी अति वेगाचा वापर करू नये. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, असा इशारा महामार्ग पोलिसांनी दिला आहे. वाहन चालवताना व्यसन करू नये. मोठ्या आवाजात गाणी लावू नयेत. ओव्हरलोड वाहने चालवू नयेत. यासारख्या गोष्टी टाळून अपघात रोखता येणे शक्य आहे. चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे चालकांनी नियमांचे पालन करावे, यासाठी पोलिसांकडून कठोर धोरण अवलंबिले जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे
शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीकडे वाढला कल
कोपर्डे हवेली : वाढता उत्पादन खर्च, उत्पादनातील घट, बाजारपेठेत शेतीमालाला मिळणारा अनियमित भाव, रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर आणि यामुळे जमिनीचा खालावलेला दर्जा आदी कारणांमुळे कोपर्डे हवेलीसह परिसरातील शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेती करण्याकडे कल वाढला आहे. पिकांमध्ये सेंद्रिय खते वापरून वाढीव उत्पादनाबरोबरच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यशही येत असल्याचे दिसून येत आहे. सेंद्रिय शेतीमालाला बाजारपेठेत मागणीही चांगली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अपेक्षित उत्पन्न मिळत आहे. टोमॅटोसह इतर पिकांमध्येही सध्या सेंद्रिय खते शेतकरी वापरत आहेत.
आनंदराव चव्हाण विद्यालयात धान्य वाटप
मलकापूर : येथील आनंदराव चव्हाण विद्यालयात शालेय पोषण आहारातील धान्याचे शासन नियमानुसार वितरण झाले. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सचिव अशोकराव थोरात यांच्या हस्ते पोषण आहार धान्याचे वाटप झाले. त्यांनी शिक्षकांनाही सूचना केल्या. एखादा विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहत असेल तर त्याच्याशी संपर्क साधून घरापर्यंत जाऊन त्यांना धान्य पोहोचवावे, अशी सूचना अशोकराव थोरात यांच्याकडून शिक्षकांना करण्यात आली.
साळुंखे महाविद्यालयात फुले जयंती साजरी
कऱ्हाड : येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. सतीश घाडगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती दिली. उपप्राचार्य मोहन पाटील, प्रा. सुभाष कांबळे, सुरेश रजपूत, सुरेश काकडे, सुरेश यादव, प्रकाश पाटील उपस्थित होते. डॉ. मारुती सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे आभार मानले.
मोरगिरी झाडांच्या देखभालीचे काम गतीने
पाटण : सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून मोरगिरी ते नाटोशी रस्त्यानजीक लावलेल्या झाडांची देखभाल करण्याचे काम गतीने सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. या रस्त्यालगत लावण्यात आलेल्या झाडांना पाणी देणे, आजूबाजूचे गवत काढणे, झाडांना खड्डे काढण्याचे काम केले जात आहे. या कामामुळे झाडांची वाढ चांगली झाली आहे. झाडांची निगा राखल्याने सामाजिक वनीकरणाच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांतून कौतुक होत आहे.