नमनाला घडाभर तेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:28 AM2021-06-03T04:28:16+5:302021-06-03T04:28:16+5:30

निवडणूक कोणतीही असो पण निवडणुकीचा काळ हा धामधुमीचा असतो. या काळातील एक एक मिनिट महत्त्वाचा असतो. आपल्या भूमिका मतदारांपर्यंत ...

Namanala ghadabhara oil! | नमनाला घडाभर तेल!

नमनाला घडाभर तेल!

googlenewsNext

निवडणूक कोणतीही असो पण निवडणुकीचा काळ हा धामधुमीचा असतो. या काळातील एक एक मिनिट महत्त्वाचा असतो. आपल्या भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे असते. सध्या तर कोरोना महामारी संकटामुळे प्रचारावर मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्या आहेत. अशा परिस्थितीत एक एक क्षण महत्त्वाचा असताना सुरू असणाऱ्या या चर्चेच्या फेऱ्या किंवा चर्चेचे गुऱ्हाळ किती बरोबर हे नेत्यांनीच ओळखलेलं बरं!

सत्ताधारी सहकार पॅनेलच्या डॉ. सुरेश भोसले यांना रोखण्यासाठी विरोधी रयत व संस्थापक पॅनलच्या नेत्यांनी एकत्रित येण्याची गरज कार्यकर्त्यांच्यातूनच व्यक्त झाली. मग माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्य सहकार मंत्री विश्वजित कदम, ॲड. उदयसिंह पाटील यांनी यात पुढाकार घेतला. डॉ. इंद्रजित माेहिते व अविनाश मोहिते यांच्या मनोमिलनसाठी पहिली बैठक मुंबईत झाली. त्यानंतरच दोन-तीन महिन्यात कोल्हापूर, कराड अशा आठ-नऊ बैठका झाल्या. अगदी आजसुद्धा (दि. २ जून) पुणे येथे मंत्री विश्वजित कदम यांच्याबरोबर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. पण या चर्चा सकारात्मक सुरू आहेत. लवकरच ‘गुड न्यूज’ मिळेल. एवढीच माहिती समर्थक निकटवर्तीयांकडून मिळत आहे.

मध्यंतरी तर हा मनोमिलनाचा चेंडू ‘थोरल्या पवारांच्या’ कोर्टात गेल्याच्या चर्चा होत्या. पण पुढे त्याचं काय झालं समजलं नाही. ‘पृथ्वीराजां’नी मात्र हे मनोमिलन खूपच मनावर घेतल्याचे दिसते. पण राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार बनवण्यात महत्त्वाची भूमिका बनवणाऱ्या आमदार चव्हाणांना हे मनोमिलन करायला एवढा वेळ का लागतोय ते समजायला मार्ग नाही.

कोरोना महामारीमुळे जाहीर सभा, कोपरा सभा होत नाहीत. वाहनांवर लाऊडस्पीकर लावून होणारा प्रचारही बंद आहे. फ्लेक्स बोर्ड, झेंडे कोठे झळकताना दिसत नाहीत. अशा पार्श्वभूमीवर प्रचाराला खूपच मर्यादा आल्याचे दिसते. थेट मतदारांपर्यंत पोहोचणे हाच मार्ग सध्यातरी उमेदवारांसमोर दिसतो आहे. अन पॅनेलचे नेते, प्रमुख कार्यकर्ते, उमेदवार मात्र या मनोमिलनाच्या चर्चेच्या फेऱ्यात अडकलेले दिसतात. निवडणूक २९ जूनला होत आहे. पण मनोमीलनाच्या चर्चेच्या फेऱ्यात हे मोहिते गट असेच अडकले तर ते प्रचार कधी व कसा करणार हे त्यांनाच माहीत.

खरंतर काळ आणि वेळ कोणासाठी थांबत नसते. मनोमिलनाची चर्चा अजून काही दिवस अशीच सुरू राहिली तर उमेदवारांच्या हातचा बराच वेळ निघून गेलेला असेल. त्यामुळे ‘तेलही गेले तूपही गेले’ अशी अवस्था होऊ नये याची काळजी दोन्ही माजी अध्यक्ष मोहिते घेतील अशी आशा करायला हरकत नाही.

प्रमोद सुकरे; कराड

Web Title: Namanala ghadabhara oil!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.