सुधारणेच्या नावाखाली उद्यानात अवैधरीत्या वृक्षतोड...
By admin | Published: December 22, 2016 11:17 PM2016-12-22T23:17:14+5:302016-12-22T23:17:14+5:30
मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : वाई नगरपालिकेकडून सोनगिरवाडीत प्रकार; २५ वर्षांपूर्वीची झाडे, वृक्षप्रेमींमधून नाराजी व्यक्त
वाई : येथील सोनगिरवाडी उद्यानातील जवळपास २५ वर्षे जुनी असणारी झाडे नगरपालिकेने तोडली आहेत. त्यामुळे वृक्षप्रेमींतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सुधारणेच्या नावाखाली झालेल्या अवैध वृक्षतोडीप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
येथील सोनगिरवाडीतील उद्यान समस्येच्या विळख्यात आहे. मुलांना खेळण्यासाठी उद्यानात ठेवण्यात आलेली खेळणी पूर्णपणे गंजलेली असून, त्याकडे मात्र पालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. पालिकेने या बागेत सुधारणेच्या नावाखाली जवळपास २५ वर्षे जुनी अशोक व गुलमोहराची नऊ झाडे कुणाचीही परवानगी न घेता अवैधपणे तोडली आहेत. वास्तविक पालिकेने जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी यांची परवानगी घेणे अनिवार्य आहे. वृक्षतोडीचे पालिका प्रशासन समर्थन करीत असून, सोनगिरवाडीतील उद्यानात सुधारणा करावयाच्या आहेत म्हणून ही वृक्षतोड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जी बाग अवैध धंद्याची केंद्रबिंदू आहे. अनेक तळीराम या ठिकाणी राजरोसपणे असतात. याकडे पालिकेचे कसलेही लक्ष नाही. वृक्षसंवर्धनाचा कर वसूल करणारी पालिका अतिशय जुनी परंतु सुस्थितीत असलेली झाडे बेपर्वाईने तोडण्यात धन्यता मानत आहे याचा वाईतील वृक्षप्रेमींनी निषेध केला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पालिका प्रशासनाने बागेत सुधारणा करण्यासाठी झाडांची कत्तल करण्याची खरच गरज आहे का?, असा प्रश्न वाईकर नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. ज्या नाना-नानी पार्कचे काम गेले कित्येक वर्ष झाले चालू आहे. त्या कामाला गती देण्याचे पालिका प्रशासनाला आजतागायत जमले नाही. जी झाडे चांगल्या स्थितीत आहेत त्यांची मात्र सुधारणेच्या नावाखाली राजरोसपणे कत्तल करण्यात येत आहे. पालिका प्रशासनाच्या गलथानपणामुळे याआधी अनेक वेळा सत्ताधारी लोकप्रतिनिधी बदनाम झाले आहेत. पालिकेची प्रशासन इमारत प्रशस्त असली तरी पालिकेचे काम मात्र अशोभनीय आहे. तरी पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन चालू असलेली बेसुमार वृक्षतोड त्वरित थांबवून पर्यावरणाचे होणारे नुकसान थांबवावे. आधी वृक्षारोपणाचा विचार व्हावा मगच वृक्षतोड करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
पालिकेला खरेच सोनगिरवाडीतील उद्यानात सुधारणा करावयाची असल्यास सर्वात प्रथम वाई शहरातील इतर उद्यानाची स्थिती सुधारावी आणि मगच या उद्यानाच्या सुधारणेचा विचार व्हावा, असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर कृष्णाई फोरमचे डॉ. प्रशांत सूर्यवंशी, अॅड. रफिक शेख, प्रशांत डोंगरे, तेजपाल वाघ, दिलीप डोंबीवलीकर, एन. डी. पाटील यांच्या सह्या
आहेत. (प्रतिनिधी)