काळूबाईच्या नावानं चांगभलं.. च्या गजराने दुमदुमले मांढरगड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 08:51 PM2019-01-21T20:51:10+5:302019-01-21T20:53:59+5:30
वाई : मांढरगडावरील काळूबाईच्या दर्शनाची आस डोळ्यात साठून महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविक सोमवारी पौष शाकंभरी पोर्णिमेला यात्रेनिमित्त गडावर दाखल ...
वाई : मांढरगडावरील काळूबाईच्या दर्शनाची आस डोळ्यात साठून महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविक सोमवारी पौष शाकंभरी पोर्णिमेला यात्रेनिमित्त गडावर दाखल झाले. असंख्य भाविक डोक्यावर देवीच्या मूर्ती घेऊन चालत येते होते. भक्तिमय वातावरणामुळे ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं...’च्या जयघोषानं मांढरगड दुमदुमले. येणाऱ्या भाविकांसाठी जिल्हा प्रशासनाने सोयीसुविधा पुरविल्या.
मांढरगडावरील काळूबाई देवीची वार्षिक यात्रा दरवर्षी पौष पोर्णिमेला भरते. यात्रानिमित्ताने सोमवारी पहाटे सहा वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा प्रमुख प्रशासक आर. डी. सावंत, पत्नी शमा यांच्या हस्ते काळेश्वरी देवीला अभिषेक घालून विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश वर्षाताई पारगावकर तसेच विश्वस्त तथा प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, तहसीलदार रमेश शेंडगे, अॅड. मिलिंद ओक, अॅड. महेश कुलकर्णी, अतुल दोशी, जीवन मांढरे, चंद्रकांत मांढरे, राजगुरू कोचळे, सुधाकर क्षीरसागर, शैलेश क्षीरसागर व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर भाविकांनी दिवसभर देवीचे दर्शन घेतले. मंगळवार, दि. २२ रोजी उत्तर यात्रा होणार आहे. त्यानंतर मुख्य यात्रेची समाप्ती होणार आहे.
अंधश्रद्धेतून होणाºया प्रकारांना फाटा देऊन काळेश्वरी देवीवरील श्रद्धा वृद्धिंगत होण्यासाठी देवस्थानमार्फत प्रयत्न केले जात आहेत. सामाजिक प्रबोधनाच्या हेतूने ट्रस्टच्या वतीने महत्त्वाच्या ठिकाणी मोठे फलक लावण्यात आले आहेत.
भाविकांमधून नाराजी...
मांढरदेव यात्रेसाठी लाखो भाविक येत असताना कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना नसल्याने प्रशासन टँकरद्वारा केलेला पाणीपुरवठा कमी पडत होता. यात्रेत पाण्याविना सर्वांचे हाल होताना दिसत आहेत. तसेच सुरक्षेच्या नावाखाली व्यावसायिकांची बैठकव्यवस्था व मार्ग बदलल्याने त्याचा व्यावसायिक व भाविकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे भाविक, व्यावसायिक, ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
डोक्यावर देवी घेऊन भाविक..
राज्याच्या कानाकोपºयातून येणारे असंख्य भाविक त्यांच्या गाड्या वाहनतळावर लावून डोक्यावर देवी घेऊन वाजत-गाजत मंदिरात नेत होते. यावेळी काळूबाईच्या नावानं चांगभलंचा जयघोष केला जात होता.