चलती का नाम ‘मोटार ड्रायव्हिंग स्कूल’

By admin | Published: December 25, 2014 09:37 PM2014-12-25T21:37:58+5:302014-12-26T00:19:31+5:30

कऱ्हाडात घनशाघोळ : परवाना नसतानाही प्रशिक्षण; ‘परिवहन’च्या डोळ्यावर झापड--लोकमत विशेष...

The name of moving 'Motor Driving School' | चलती का नाम ‘मोटार ड्रायव्हिंग स्कूल’

चलती का नाम ‘मोटार ड्रायव्हिंग स्कूल’

Next

कऱ्हाड : चारचाकी घरच्या घरीही शिकता येते; पण योग्य प्रशिक्षण व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अनेकजण ‘ड्रायव्हिंग स्कूल’ला पसंती देतात. असे प्रशिक्षण देण्यासाठी अनेक स्कूलही कार्यरत आहेत. मात्र, कऱ्हाडातील काही ‘ड्रायव्हिंग स्कूल’ला परवानाच नसल्याची माहिती उजेडात येत आहे. परवाना रद्द झाला असताना अथवा त्याचे नूतनीकरण केलेले नसतानाही अनेकजण असे बेकायदा ड्रायव्हिंग स्कूल चालवतायत.
काही वर्षांपूर्वी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपत होती. शहरी भागातच अशा संस्था कार्यरत होत्या. मात्र, सध्याची परिस्थिती वेगळी आहे. वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणारे ‘ड्रायव्हिंग स्कूल’ अगदी गल्लीबोळातही सुरू झालेत. एकट्या कऱ्हाड शहरात अशा आठ-दहा संस्था कार्यरत आहेत आणि या संस्थांकडे प्रवेश घेतलेल्यांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. कार, जीप, ट्रक यासह अन्य वाहने चालविण्याचे प्रशिक्षण या स्कूलमधून दिले जाते. त्यातही वेगवेगळ्या कंपनीच्या कार व जीप चालकास चालविण्यास शिकविल्या जातात. त्यासाठी संबंधित संस्थांकडेही अनेक कार व जीप उपलब्ध आहेत. स्कूलमधून प्रशिक्षण घेणे सुरक्षेच्या दृष्टीने चांगले असल्यामुळे अनेकजण अशा स्कूलमध्ये फी भरून वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेतात. संबंधित स्कूलमधून वाहन चालविण्याचा परवानाही मिळवून दिला जातो.
कऱ्हाडातील काही ‘ड्रायव्हिंग स्कूल’चा कारभार यापूर्वी वारंवार चव्हाट्यावर आला आहे. प्रशिक्षण देताना काही स्कूलच्या गाड्या गर्दीच्या ठिकाणीच बंद पडल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी प्रशिक्षण दिले जात असताना वाहतुकीची कोंडी होण्यासारखे प्रकार घडतात. मुख्य रस्त्यांवरच चालकांना प्रशिक्षण दिले जात असल्यामुळे इतर वाहनचालकांनाही त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. सध्या स्कूलवाल्यांचा आणखी एक प्रताप चव्हाट्यावर आलाय. परवाना नसतानाही त्यांच्याकडून वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. परवाना नसतानाही संबंधित स्कूलची वाहने रस्त्यावरून धावताना दिसतात. (प्रतिनिधी)


एकाचा परवाना रद्द
बेकायदा ड्रायव्हिंग स्कूल सुरू असल्याबाबत परिवहन कार्यालयाशी संपर्क साधला असता कऱ्हाडातील ‘पवार ड्रायव्हिंग स्कूल’चा परवाना रद्द केला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नवीन परवान्याबाबत त्यांची कार्यवाही सुरू होती. मात्र, अद्याप आमच्या कार्यालयाकडे त्याबाबत कसलाही अर्ज आला नसल्याचे परिवहन अधिकारी नीळकंठ पाटील यांनी सांगितले.



‘परिवहन’कडून मिळतो परवाना
१ अर्जदार किंवा संबंधित स्कूलला मार्गदर्शन करणारा व्यक्ती आॅटोमोबाईल इंजिनिअर असणे आवश्यक असते.
२ सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर तसा प्रस्ताव परिवहन कार्यालयाकडे सादर केला जातो. परिवहनच्या स्थानिक कार्यालयाने प्रस्तावाची शहानिशा केल्यानंतर तो मंजुरीसाठी कोल्हापूरला पाठविला जातो.
३ परवान्याचे एक अथवा तीन वर्षांनंतर नूतनीकरणही करावे लागते.
४ त्याठिकाणी अर्जदाराला पाच हजार रुपये फी भरावी लागते. त्यानंतर स्कूलसाठीचा परवाना दिला जातो.
५ ड्रायव्हिंग स्कूल सुरू करावयाचे असल्यास त्यासाठी परिवहन विभागाचा परवाना आवश्यक असतो. परवान्यासाठी अर्जदाराची स्वत:ची अथवा भाडेतत्त्वावरील जागा असणे गरजेचे असते.

Web Title: The name of moving 'Motor Driving School'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.