रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली वृक्षांवर कुऱ्हाड

By admin | Published: January 21, 2017 09:14 PM2017-01-21T21:14:12+5:302017-01-21T21:14:12+5:30

कऱ्हाडात ठेकेदाराचा प्रताप : गटार बांधकामासाठी वृक्षांवर घाला; पालिकेकडून केवळ बघ्याची भूमिका

In the name of road width, Kurchad | रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली वृक्षांवर कुऱ्हाड

रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली वृक्षांवर कुऱ्हाड

Next

कऱ्हाड : येथील विजय दिवस चौक ते कृष्णा नाका मार्गावरील रस्त्याच्या बाजूला उपजिल्हा रुग्णालय परिसरात रुंदीकरण कामावेळी संबंधित बांधकाम ठेकेदाराकडून पालिकेची परवानगी न घेता वृक्षतोड करण्यात आले असल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. रस्ता रुंदीकरण व गटार बांधकाम करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सर्रासपणे वृक्षतोड केली जात असल्याने याबाबत पालिकेतील पदाधिकारी, अधिकारीही गप्प असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका या मुख्य मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी सुरुवातीला रस्त्याकडेला नाले बांधकाम केले जात आहे. दरम्यान, या कामामध्ये १५ मीटर रस्त्याची रुंदी करताना रस्त्याच्या मध्यभागी एक मीटर रुंदीच्या दुभाजकाचे बांधकाम केले जाणार आहे.
रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडीचशे वृक्षांचा अडथळा येत असल्याने त्यांच्यावर ठेकेदाराकडून कुऱ्हाड पडणार असल्याची चर्चा केली जात होती. मात्र, यास सुरुवातीस वृक्ष प्राधिकरण समितीच्या वतीने विरोध करण्यात आला. व ठेकेदाराने वृक्षतोड न करता पदपथ व
रस्ता रुंदीकरणाचे कामे करावे,
अशी मागणीही करण्यात आली. त्याबाबत सध्या काही निर्णय झाला नसल्याचे दिसून येते. कारण रस्ता रुंदीकरण करताना बांधण्यात येत असलेले नाले यामध्ये येणाऱ्या वृक्षांना तोडले जात आहे. विशेष म्हणजे ही तोड रात्रीच्या वेळी केली जात
आहे. संबंधित ठेकेदाराने आतापर्यंत २९ वृक्ष तोडले आहे. यापूर्वी कऱ्हाड अर्बन बँक ते शहर पोलिस
स्टेशन मार्गावरती असणारे वृक्ष ठेकेदाराने तोडले होते. त्यास
त्यावेळी पालिकेच्या वतीने नोटीसही देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
रस्ता रुंदीकरणाच्या कामात वृक्षाप्रमाणे वीजवितरण कंपनीच्या लोखंडी पोलचा अडथळा येत आहे. रस्ता रुंदीकरण व नाला बांधकाम करण्यापूर्वी विद्युत पोल हटविणे गरजेचे आहे. मात्र, वीजवितरण कंपनीकडूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने कामास अडथळा निर्माण होत आहे. परंतु पोल न हटविता ठेकेदाराकडून वृक्षांची तोड करीत काम केले जात आहे. तरी देखील पालिकेकडून संबंधित ठेकेदारावर कोणतीच कारवाई
केली जात नसल्याने याप्रकाराबाबत नागरिकांमधूनही आश्चर्य
व्यक्त केले जात आहे. कऱ्हाड शहरातील उपजिल्हा रुग्णालय परिसरात गटार बांधकामासाठी ठेकेदाराने शुक्रवारी वृक्ष तोडले. (प्रतिनिधी)


वृक्षतोडी विरोधात असा आहे गुन्हा.......
‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन १९७५’ या कायद्यांतर्गत वृक्षांसंदर्भातील तरतुदीचे उल्लंघन करून झाड तोडणे, झाड तोडण्यास कारणीभूत होणे, आदेश पालनात कसूर आणि कर्तव्य पालनात अडथळा आणणाऱ्या व्यक्तीला अपराध सिद्ध झाल्यानंतर प्रत्येक गुन्ह्यासाठी शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. गुन्हेगारास दिला जाणारा कारावास एक आठवड्यापेक्षा कमी आणि एक वर्षापेक्षा जास्त नसेल. त्याचबरोबर दंडाची रक्कमही प्रत्येक अपराधाकरिता एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत असेल. याशिवाय वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत देखील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करता येऊ शकतो.


वृक्ष प्राधिकरण समिती नावालाच !
शहरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्षतोडीवर निर्बंध लादण्यासाठी पालिकेकडून कोणतीच पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे वृक्षसंवर्धनाबाबत निर्णय घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेली वृक्ष प्राधिकरण समितीही नुसती नावालाच असल्याचे दिसून येते. या समितीची वर्षभरात एकही बैठक झालेली नाही.


दिवसा पदपथाचे काम तर रात्री वृक्षतोडीचा खेळ चाले..
दिवसा मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर प्रवाशांची गर्दी व वाहनांची वाहतूक होत असल्याने गटार बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराकडून दिवसा बांधकामाचे काम केले जात आहे. जशी रात्री झाली की, वृक्षतोड करण्यात येत असल्याने दिवसा पदपथाचे काम व रात्रीस वृक्षतोडीचा खेळ चालत आहे.


कारवाई करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
वृक्षतोडीबाबत वनविभाग अथवा पालिकेची पूर्वपरवानगी घेणे गरजेचे होते. मात्र, ठेकेदाराने ती घेतलेली नाही. त्यामुळे ठेकेदारावर पालिकेनने वृक्ष अधिनियमचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करावी, याबाबतची माहिती जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आली असल्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सांगितले.
पर्यावरण जनजागरण अभियान वर्षभरात गुंडाळले !
पालिकेच्या वतीने शहरात सुरू करण्यात आलेल्या पर्यावरण जनजागरण अभियान हे आता नुसते नावालाच उरले असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पर्यावरणाबाबत व शहरातील स्वच्छतेबाबत पालिकेकडून कोणत्याच उपाययोजना केल्या जात नसल्याने हे अभियान वर्षभरातच गुंडाळले आहे.
पालिकेकडून नोटीस देऊनही सर्रास वृक्षतोड
रस्ता रुंदीकरण व गटार बांधकाम करताना परवानगीशिवाय वृक्षतोड करू नये तसेच वृक्षतोड केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, अशाप्रकारे संबंधित ठेकेदारास पालिकेकडून मध्यंतरी नोटीसही देण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत सर्रासपणे वृक्षतोड केली जात आहे.

Web Title: In the name of road width, Kurchad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.