मृत व्यक्तीच्या नावे बोगस खाते काढून फसवणूक
By admin | Published: December 9, 2015 11:49 PM2015-12-09T23:49:02+5:302015-12-10T01:01:35+5:30
एकाला अटक : ‘अजिंक्यतारा’च्या संचालकासह तिघांवर गुन्हा
सातारा : उसाचे बिल मिळण्यासाठी मयत सोनूबाई जाधव यांच्या नावावर बोगस खाते काढून फसवणूक केल्याच्या आरोपावरून सातारा तालुका पोलिसांनी लळूबाई जाधव, आनंदराव श्रीरंग जाधव (नेले, ता. सातारा) व अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक शंकर महादेव धोत्रे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, आनंदराव जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा तालुक्यातील नेले येथे मृत सोनूबाई जाधव यांची जमीन आहे. त्यांचे २००४ मध्ये निधन झाले. कोणाच्याही संमतीशिवाय लळुबाई जाधव व आनंदराव जाधव यांनी त्यांच्या शेतात ऊस लावला होता. सोनूबाई यांच्या नावाने सातबारा असल्याने उसाचे बिल थेट सोनूबाई यांच्या खात्यात जमा होत होते. सोनूबाई यांचे निधन झाल्यानंतर जाधव माय-लेकांनी ऊस उत्पादन सुरूच ठेवले होते. मात्र, उसाचे बिल सोनूबाई यांच्या नावावर जाणार असल्याने त्यांनी जिल्हा बँकेच्या नेले शाखेत सोनूबाई जाधव यांच्या नावाने बोगस खाते उघडले. यावर मुख्य साक्षीदार म्हणून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक शंकर महादेव धोत्रे यांची सही आहे. यानंतर एक दिवस सोनूबाई यांचा मुलगा सुनील जाधव हे जिल्हा बँकेत काही कामानिमित्त गेले होते. त्यावेळी तेथे पैसे घेण्यासाठी सोनूबाई जाधव हे नाव पुकारले. त्यावेळी आईचे निधन होऊन सात वर्षे झाली तरी खाते सुरू कसे, असा प्रश्न त्यांना पडला. त्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. (प्रतिनिधी)
सात वर्षांत १ लाख १५ हजारांचा व्यवहार
सात वर्षांच्या कालावधीत १ लाख १५ हजारांचा त्यांच्या खात्यावर व्यवहार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. फसवणूक केल्याच्या आरोपाखाली लळुबाई जाधव, आनंदराव जाधव व शंकर धोत्रे यांच्यावर कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ आणि ३४ या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.