वृक्षांच्या नावाने घरांचे नामकरण, सातारा जिल्ह्यातील 'या' गावात राज्यातील पहिलाच उपक्रम
By दीपक शिंदे | Published: December 12, 2023 04:51 PM2023-12-12T16:51:48+5:302023-12-12T16:52:05+5:30
वृक्षांची संपूर्ण माहितीही त्या घराच्या भिंतीवर आणि दरवाजांवर लावण्यात आली
ढेबेवाडी : ‘कुणी बाळाचं नामकरण करतं.. तर कुणी आपल्या व्यवसायात दुकानांचं नामकरण करतं; पण पाटण तालुक्यातील मान्याचीवाडीकरांनी अख्खा गावातील सर्वच घरांचा नामकरण सोहळा केला; मात्र या घरांना कुठल्या व्यक्तींची नावे नव्हे तर देशी प्रजातींच्या वृक्षांची नावे देण्यात आली आहेत. मंगळवारी सकाळी संपूर्ण गावकऱ्यांच्या उपस्थितीत हा नामकरण सोहळा पार पडल्याने आता मान्याचीवाडीतील घरांची ओळख वृक्षांच्या नावाने होणार आहे. विविध प्रकारच्या तीसवर देशी प्रजातींच्या सुमारे पाचशे वृक्षांचे रोपण घरासमोर करण्यात आले असून, त्या वृक्षांची संपूर्ण माहितीही त्या घराच्या भिंतीवर आणि दरवाजांवर लावण्यात आली आहे.
पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी गावाने ग्रामविकासात नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रमांद्वारे योगदान दिले आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजना आणि उपक्रम यांची प्रभावी अंमलबजावणी करत ग्रामविकासात दिशादर्शक ठरले आहे. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत या गावाने भूमी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वावर काम करत असताना वृक्षलागवड आणि संवर्धन याची यशस्वी सांगड घातली आहे.
यामध्ये आता गावकऱ्यांसह ग्रामविकासाच्या अभ्यासासाठी येणाऱ्या प्रतिनिधींना देशी प्रजातींच्या वृक्षांची ओळख व्हावी तसेच देशी वृक्षांबाबत प्रेम निर्माण व्हावे यासाठी गावातील प्रत्येक घरासमोर आंबा, चिक्कू, दालचिनी, काजू, पेरू, जांभूळ अशा तीसवर जातींच्या वृक्षांची लागण करण्यात आली आहे. ज्या घरासमोर ज्या जातीच्या वृक्षाचे रोपण करण्यात आले आहे, त्या घराला त्या वृक्षाचे नाव देण्यात आले आहे. तसेच त्या वृक्षांचे फायदे, उपयोग, वनस्पती शास्त्रीय माहिती आदी बाबींचा उल्लेख असलेले पोस्टर्सही वृक्षाशेजारी लावण्यात आले आहेत.
यावेळी सदस्य उत्तमराव माने, दिलीप गुंजाळकर, लता आसळकर, निर्मला पाचपुते, सीमा माने, मनीषा माने, ग्रामसेवक प्रसाद यादव, सर्जेराव माने, विठ्ठल माने, दादासोा माने आदींची प्रमुख उपस्थिती होती.
दोनशे घरांचे एकाचवेळी नामकरण..
मान्याचीवाडी गावात १२८ कुटुंबे आहेत तर ४२५ लोकसंख्या आहे आणि २१२ घरांची संख्या आहे. या सर्वच घरांचा नामकरण सोहळा ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला.
..अशी होईल घरांची ओळख
आंबा घर, चिक्कू घर, दालचिनी घर, काजू घर, पेरू घर, जांभूळ घर, आवळा घर, फणस घर, मोहगणी घर, चेरी घर, सीता अशोक घर.
यापूर्वीही साकारल्या होत्या अभ्यास गल्ल्या..
कोरोना काळात या गावातील विद्यार्थी शिक्षणापासून दूर जाऊ नये म्हणून गावातील घरांच्या भिंतीवर सामान्य ज्ञान, इतिहास, गणित आदी विषयांचे हजारो प्रश्न उत्तरे, गणितीय सूत्र, ऐतिहासिक माहिती लिहिण्यात आली होती. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना आणि विशेषतः अभ्यासकांनाही होत आहे.
..मिळकतीवरही होणार नोंदी
ग्रामपंचायत मिळकतीवर आठ ‘अ’च्या उताऱ्यावर वाॅर्ड आणि खातेदारांच्या नावांचा आणि संबंधित वाॅर्डाचा तसेच गल्लीचा उल्लेख असतो; मात्र आता मान्याचीवाडीतील खातेदारांच्या मिळकतीच्या उताऱ्यावरही घरांच्या नामकरणाचा उल्लेख होणार आहे.
विदेशी वृक्षांचे आक्रमण शहरात होत असताना त्याची लागण ग्रामीण भागातही होऊ लागली आहे. यामुळे देशी वृक्षांबाबत दिवसेंदिवस दुरावा निर्माण होत आहे. यामुळे औषधी वनस्पतींसह मूळ देशी प्रजातींच्या वनस्पती दुर्मीळ होत आहेत. नव्या पिढीला अशा वनस्पती अथवा वृक्षांबाबत ओळख निर्माण व्हावी तसेच औषधी आणि ऑक्सिजन युक्त वृक्षांची गावागावात मोठ्या प्रमाणात लागवड आणि संवर्धन व्हावे, यासाठीच हा प्रयत्न आहे. -प्रसाद यादव, ग्रामसेवक, मान्याचीवाडी