कुणी राधा घ्या, कुणी सीता घ्या...; साताऱ्यात ७० हून अधिक मुलींचं एकाच वेळी नामकरण, जगातील पहिलंच सामूहिक बारसं
By दीपक देशमुख | Published: March 8, 2023 04:07 PM2023-03-08T16:07:49+5:302023-03-08T16:08:21+5:30
महिला दिनाचे औचित्य साधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिवारातील ७० हून अधिक मुलींच्या बारशाचा सोहळा पार पडला
सातारा : सामूहिक विवाह सोहळ्याबाबत ऐकले होते; पण सामूहिक बारसे पहिल्यांदाच ऐकले. सातारा शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलींच्या सामूहिक बारशाचा आजचा उपक्रम राज्याला नक्कीच दिशा देणारा आहे. असा उपक्रम महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात प्रथम होत असेल, असे गौरवोद्गार भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काढले.
सातारा येथील राधिका संकुलात महिला दिनाचे औचित्य साधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिवारातील ७० हून अधिक मुलींच्या बारशाचा कार्यक्रम भाजप महिला मोर्चाच्या वतीने उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. सुनिशा शहा, सुरभी भोसले, सुवर्णा पाटील, माजी नगरसेवक विकास भोसले, विठ्ठल बलशेटवार आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी चित्रा वाघ म्हणाल्या, महिला एक दिवस संपावर गेल्यातर काय होईल, याची कुणी कल्पना करू शकत नाही. महिलांना देवत्व देऊ नका; पण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मात्र नक्की द्या. आजची महिला कुठेच कमी नाही. तिला आर्थिक बळ मिळणे गरजेचे आहे. आगामी काळात महिला आर्थिक स्वावलंबी कशी होईल, यासाठी महिला माेर्चा काम करेल. महिला जोपर्यंत आर्थिक सक्षम होत नाही तोपर्यंत तिचे सक्षमीकरण होऊ शकत नाही. केंद्र सरकारच्या माध्यमातून सातारा महिलांतील कर्तृत्वाला वाव देणार आहे.
लहान मुलांचे बारसे करताना एक ते दोन वर्षांच्या नामकरण न झालेल्या मुलींचेही बारसे झाले. ५१ मुलींचे बारशाचे नियोजन होते; पण ७० हून अधिक मुलींची बारशी झाली. या उपक्रमामुळे मनस्वी आनंद होत असल्याचे उद्गगार वाघ यांनी काढले.
यानंतर वाघ यांनी स्वत: काही मुलींचे नामकरण केले. यावेळी नवजात मुलींना भेटवस्तू, पालकांना पोशाख करण्यात आले. हळदी-कुंकू व वाणवाटप सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत मुलींच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली.
नैराश्यातून विरोधकांची वक्तव्ये
कार्यक्रमानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राजघराण्याचा भाजपत सन्मान नसल्याचे विरोधकांचे आरोप असल्याचे पत्रकारांशी सांगितले असता वाघ म्हणाल्या, हातातोंडाशी असलेला घास गेल्यामुळे विरोधक नैराश्यवस्थेत आहेत. त्यामुळे ते वाट्टेल ते बोलत आहेत. त्यांची वक्तव्ये गांभिर्याने घेण्याची गरज नाही. तसेच महिलांच्या सुरक्षितेला सरकार प्राधान्य देत आहे. शक्ती कायदा झाला तर त्याचे स्वागत आहे. तरीही सध्याचे कायदे सक्षम असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.
गेल्या सात महिन्यात महिला अत्याचारप्रकरणी कसूर केलेल्या दोन डझन पोलिसांना निलंबीत केले आहे. बारा वर्षांच्या आतील मुलीवर अत्याचार झाल्यास फाशीची तरतूद करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महिलांना सुरक्षा हे आमचे प्राधान्य आहेच; पण समाजाने अशा विकृती हटवण्यासाठी सहभाग घेण्याची व जनजागृतीची गरज आहे.