फलटणमध्ये ‘नामकरण’ पेटले !
By admin | Published: September 7, 2014 12:12 AM2014-09-07T00:12:55+5:302014-09-07T00:13:21+5:30
पालिकेसमोर ठिय्या : रामराजेंचे नाव जलतरण तलावास देण्यावरून विरोधकांचे आंदोलन;सीसीटीव्ही फुटेज गायब
फलटण : फलटण नगरपालिकेच्या सभेत भडकमकरनगर येथील जलतरण तलावास रामराजे नाईक-निंबाळर यांचे नाव देण्याच्या ठरावाला विरोध करण्यासाठी शनिवारी सायंकाळी विरोधी पक्षातर्फे पालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ठरावाला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांच्या विरोधात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी व तक्रार यावेळी पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली.
दि. ४ रोजी पालिका सभेत जलतरण तलावाला रामराजेंचे नाव देण्यावरून विरोधकांनी रान तापवित नगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. मात्र पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. दुपारी ४.३० च्या सुमारास ठिय्या आंदोलना सुरुवात झाल्यानंतर काही दलित संघटनांनी या आंदोलनाला विरोध करीत यामध्ये राजकारण आणू नका असे सुनावले. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. विरोधी पक्षनेते अनुप शहा यांनी पालिकेत ठरावावरून घडलेला प्रसंग सांगून ‘याबाबत कोणतेही राजकारण नाही. तुम्ही मिटिंगचे सीसीटीव्ही फूटेज पाहा,’ असे सांगितल्यानंतर सर्वजण नगरपालिकेत फूटेज पाहण्यास गेले असता फूटेजच गायब असल्याचे आढळून आले. त्यामुळे दलित संघटनांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. यातील काहींनी ठरावाला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांविरोधात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आंदोलनात भाग घेतल्यावर आंदोलनाची धार अधिकच वाढली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल माकणीकर यांनी आंदोलकांची समजूत घालीत तुम्ही लेखी तक्रारी द्या, त्या अनुषंगाने चौकशी करू, अशी ग्वाही दिली.
यावेळी रणजितसिंह म्हणाले, ‘सत्ताधारी जिवंत व्यक्तींची सरसकट नावे विविध प्रकल्पांना देत असून यामागचे त्यांचे राजकारण जनता ओळखून आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव जलतरण तलावाला देण्याची मागणी केल्यावरून सर्वांनी एकमुखी पाठिंबा देणे गरजेचे होते, मात्र सत्ताधारी गटाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा रामराजे मोठे वाटत असल्याने या ठरावाच्या घटनेचा आपण निषेध करतो. ठरावाला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांवर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली.
या आंदोलनात रणजितसिंह यांच्या बरोबरच पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे-पाटील, अनूप शहा, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस जयकुमार शिंदे, स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोकराव जाधव, मनसेचे उपजिल्हाप्रमुख युवराज शिंदे, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, अशोकराव भोसले, माजी नगरसेवक जाकीर मणेर, रियाज इनामदार, सुभाष गायकवाड, आदी सहभागी झाले होते.
दरम्यान, यावेळी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याच्या मागणीसाठी मोठी गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)