नानांची सत्तेची भूक अजूनही संपता संपेना !

By admin | Published: February 10, 2017 10:22 PM2017-02-10T22:22:45+5:302017-02-10T22:22:45+5:30

मदनराव मोहिते : त्यांचं जॅकेट जनताच उतरवेल; बाबांची दक्षिणेतील निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाळ अजूनही तुटलेलीच

Nana's power hunger is still ending! | नानांची सत्तेची भूक अजूनही संपता संपेना !

नानांची सत्तेची भूक अजूनही संपता संपेना !

Next



कऱ्हाड : आनंदराव पाटील यांनी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपदही अडवून ठेवलंय. विधानपरिषदेची आमदारकी त्यांच्याच घरात. पुतण्या बाजार समितीवर संचालक. आता मिसरुड फुटलेल्या मुलाला जिल्हा परिषद सदस्य करण्यासाठी ते उतावळे झालेत. नानांची सत्तेची भूक अजूनही संपता संपेना. पृथ्वीराजबाबांना निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे बघायला वेळ मिळेना म्हणून वैतागूनच आपण त्यांचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला आहे. मनमानी करणाऱ्या नानांचे जॅकेट जनता उतरविल्याशिवाय राहणार नाही,’ अशी टीका ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांनी केली.
विंग, ता. कऱ्हाड येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, पैलवान आनंदराव मोहिते, मुकुंद चरेगावकर, धोंडिराम जाधव, दाजी जमाले, वि. तु. सुकरे, श्रीरंग देसाई, सचिन पाचुपते, अनिल कचरे, कोयना वसाहतीचे सरपंच राजेंद्र पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मदनराव मोहिते म्हणाले, ‘दक्षिणेत उरावर बसलेलं उंडाळ्याचं भूत गाडण्यासाठी घरच्यांचा विरोध पत्करून पृथ्वीराजबाबांना विधानसभेला मदत केली. लोकं म्हणतात की दादा तुमच्यामुळे बाबा निवडून आले. मी तसं म्हणत नाही; पण पृथ्वीराजबाबांना निवडून आणण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले. त्याला यश आले. बाबा आमदार झाले. ते कार्यकर्त्यांना चांगली वागणूक देतील, असं वाटत होतं. मात्र, बाबांची आणि दक्षिणेतील निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाळ आजही जुळलेली दिसत नाही.
दरबारी राजकारणात पारंगत असलेल्या बाबांना इथले राजकारण समजायला खूप वेळ लागेल. माझ्यासारख्या स्वाभिमानी माणसाला त्या दोघांची कार्यपद्धती न पचणारी आहे. म्हणून हा निर्णय घ्यावा लागला.’
विलासराव पाटील-उंडाळकर यांचा समाचार घेताना मदनराव मोहिते म्हणाले, ‘त्यांनी मतदार संघात किती संस्था काढल्या हा संशोधनाचा विषय आहे. एक रयत कारखाना काढला; मात्र तो मयत होतोय, असे वाटताच तो भाड्यानं चालवायला दिला. त्यांनी आता दक्षिणच्या सत्तेची स्वप्न पाहू नयेत.’
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘दिवंगत यशवंतराव मोहिते भाऊ व जयवंतराव भोसले यांनी या भागात विकासाचं स्वप्न सत्यात उतरविण्याचं काम केलं; पण काहीनी आमच्यात संघर्ष पेटवून स्वत:ची पोळी भाजून घेतली. मात्र, यापुढे असं होऊ देणार नाही. मोहिते-भोसले परिवार एकदिलाने काम करेल. ’
डॉ. अतुल भोसले म्हणाले, ‘नेहमीच मदनराव मोहिते यांचा आदर करीत आलो आहे. यापुढे त्यांच्या मार्गदर्शनाखाली चुका सुधारून वाटचाल करणार आहे. आता आम्ही मनात काहीही न ठेवता एक झालोय. त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनीही जुन्या काही गोष्टी विसरून कामाला लागावे. (प्रतिनिधी)
यादवांचा काटा यांनीच काढला
नानांना एकमेकांवर कुरघोड्या करण्याची खूप आवड. कऱ्हाड पालिका निवडणुकीत बाबांनी नानांना जरा बाजूला ठेवले. त्याचा राग मनात धरून यांनी राजेंद्र यादव यांचा काटा काढला. जयवंत पाटील यांना हा काटा लागता-लागता राहिला. नाही तर त्यांचीही विकेट त्यांनी घेतली असती. नानांच्या या उचापतीमुळे १६ नगरसेवक निवडून येऊनही बाबांच्या बंगल्याकडे फक्त एक नगरसेविकाच फिरकली.
दुसऱ्यांच्या कुबड्यांवर आमदार होता येत नाही...
‘भोसले-उंडाळकर मैत्रिपर्वाची खिल्ली उडविताना आमदार व्हायचं असेल तर दुसऱ्यांच्या कुबड्यांवर होता येत नाही. आमदार होण्यासाठी स्वत:ची ताकद वाढवा, असं मी अतुलला पटवून सांगितलं. त्याला ते पटलेलं दिसतंय. म्हणून त्याने कुबड्या झुगारून दिल्या आहेत. आम्ही एकदा गाडलेलं भूत तुम्ही पुन्हा उकरून काढू नका,’ असे मदनराव मोहिते यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

Web Title: Nana's power hunger is still ending!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.