गावोगावी फिरणारा नंदीवाला चक्क भांडी कारखानदार
By Admin | Published: March 11, 2017 09:46 PM2017-03-11T21:46:13+5:302017-03-11T21:48:47+5:30
स्वयंप्ररणेतूनच ‘आशीर्वाद’ नावाचा भांडी बनविण्याचा मोठा उद्योगच सुरू केला.
कायमचीच थांबली भटकंती : कष्ट करण्याची तयारी असल्याने कितीही लांबची उडी होते यशस्वी दिले दाखवून
बेलाच्या पाठीवर रंगीबेरंगी झूल, कमानीदार शिंगाना झुबकेदार बेगीड, गळ्यात घुंगराच्या माळा असा सजलेला नंदी आणि त्यासोबत खांद्यावर उपरणे घेऊन डोक्याला मुंडासे बांधलेला गावोगावी फिरणारा नंदीवाला म्हणजे ग्रामीण भागातील संस्कृतीचं वेगळं रूप! पण हीच संस्कृती जोपासताना पोटाची खळगी भरण्यासाठी आणि संसाराचा गाडा पुढे नेण्यासाठी अपार कष्टही त्यांच्याच भाळी लिहिलं असतं. चार-सहा भांडी डोक्यावरल्या पटीत टाकून ती गावोगावी विकण्याचा नंदीवाला समाजातील लोकांचा पारंपरिक व्यवसाय, यातूनच जमणाऱ्या तुटपुंज्या कमाईवर आयुष्याची वाट चालत राहायची हा शिरस्ता पाळला जायचा; मात्र याला छेद दिला तो खंडाळ्यातील हणमंतराव पवार यांनी.गावोगावी भांडी विकण्यासाठी करावी लागणारी पायपीट बंद करण्याच्या इराद्याने हणमंतराव पवार यांनी खंडाळ्यात छोटे दुकान सुरू केले. स्वयंप्ररणेतूनच ‘आशीर्वाद’ नावाचा भांडी बनविण्याचा मोठा उद्योगच सुरू केला. याच फॅक्टरीतील खेडोपाड्यातसह शहरातील स्टील सेंटर दुकानामधून पुरवठा होतात. त्यांनी पारंपरिक व्यवसायातून प्ररणा घेऊन नवउद्योगात घेतलेली ही भरारी समाजबांधवांना नवी दिशा देणारी ठरत आहे.
ऐंशीच्या दशकात खंडाळ्यातील अनेक खेड्यातून पवार डोक्यावरून भांड्यांची पाटी घेऊन दारोदारी हिंडत होते. दिवसभराची पायपीट करून सायंकाळी घरी परतताना चार पैसे दिमतीला कसेबसे जमायचे. मात्र जिद्द न सोडता याच व्यवसायात वेगळे काही करण्याचा ध्यास त्यांनी जोपासला. खंडाळ्यात स्थिर झाल्यावर छोटेखानी भांड्याचे दुकानही सुरूही केले. मात्र, धडपड वेगळं काही करण्याची होती. पुणे शहरातून भांडी आणण्यापेक्षा आपणच ती बनवावी ही कल्पना मनात घर करून गेली आणि नव्या उद्योगाच्या प्रारंभाने उभारी घेतली. समाजातील बुजूर्गांच्या आशीर्वादाने ‘आशीर्वाद’ स्टील उद्योग वास्तवात साकारला गेला. शून्यातून निर्माण केलेल्या या उद्योगाने आज लाखोंची उड्डाणे घेतली आहेत. खंडाळ्यातून तयार होणारा माल आता सातारा, कोल्हापूर, पुणे, यासह अन्य शहरातही पोहोचला जातोय.
भांडी विकणे हा आमचा पारंपरिक व्यवसाय होता. मात्र, तो मर्यादित होता. रोजच्या पोटापुरताच त्यामागे विचार असायचा; पण रोजची दगदग पिढ्यान्पिढ्या चालू ठेवणे योग्य नव्हते म्हणूनच वेगळा प्रयोग करण्याचं धाडस केलं. त्याला लोकांचा आशीर्वाद मिळाला. म्हणूनच हे यशश्वीरीत्या घडू शकलं.
- हणमंतराव पवार, खंडाळा
दशरथ ननावरे