नारायणवाडी सेवानिवृत्त सैनिकाचे मिरवणुकीने स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:43 AM2021-08-13T04:43:52+5:302021-08-13T04:43:52+5:30

नारायणवाडी येथील जवान प्रवीण मोहन यादव हे १७ वर्षे देशसेवा पूर्ण करून मायभूमीत परतले. त्या वेळी त्यांचे सपत्नीक अविस्मरणीय ...

Narayanwadi retired soldier welcomed with procession | नारायणवाडी सेवानिवृत्त सैनिकाचे मिरवणुकीने स्वागत

नारायणवाडी सेवानिवृत्त सैनिकाचे मिरवणुकीने स्वागत

Next

नारायणवाडी येथील जवान प्रवीण मोहन यादव हे १७ वर्षे देशसेवा पूर्ण करून मायभूमीत परतले. त्या वेळी त्यांचे सपत्नीक अविस्मरणीय असे स्वागत करण्यात आले.

यादव हे गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेले आहेत. लहानपणापासून सैन्य दलात जाण्याचे वेड असल्याने मेहनत व जिद्द, चिकाटीच्या जोरावर त्यांची २००४ मध्ये भरती झाली. बेळगाव येथे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेचा प्रवास सुरू केला. पश्चिम बंगाल, आसाम, जम्मू काश्मीर, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश यासह उणे तापमान असलेल्या सियाचीन येथे देशसेवा केली. १७ मराठा लाइट इन्फंट्री या बटालियनमध्ये ते कार्यरत होते. चांगल्या कामगिरीबद्दल त्यांचा बटालियनच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला आहे.

सेवा पूर्ण करून आल्यानंतर त्यांचे गावात स्वागत झाले. भैरवनाथ गणेश मंडळाने मिरवणुकीचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस प्रारंभ झाला. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतशबाजी अन् फुलांचा वर्षाव अशा उत्साहात मिरवणूक झाली. ग्रामपंचायत, सेवा सोसायटी, गावातील सार्वजनिक मंडळे यांच्या वतीने यादव यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

या वेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुकुंद पन्हाळे, तानाजी देशमुख, दिलीप यादव, रंगराव यादव, जालिंदर यादव यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच शकुंतला नलावडे, सोसायटीचे अध्यक्ष महादेव यादव, उपसरपंच रणजित देशमुख, प्रदीप पाटील, सुनील देशमुख, पंडितराव पाटील, दीपक देशमुख आदी उपस्थित होते. कृष्णात यादव यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले.

फोटो.

नारायण वाडी ता. कराड येथील जवान प्रवीण यादव यांची सजविलेल्या बैलगाडीमधून मिरवणूक काढण्यात आली.

Web Title: Narayanwadi retired soldier welcomed with procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.