नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास डळमळीत, शरद पवार यांचे टीकास्त्र
By सचिन काकडे | Published: May 9, 2024 03:37 PM2024-05-09T15:37:13+5:302024-05-09T15:38:12+5:30
आपलं स्थान संकटात आल्याची त्यांना भीती
सातारा : इंडिया आघाडीला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन मिळत आहे. हा प्रतिसाद पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. आपले स्थान संकटात आल्याची त्यांना भीती वाटत आहे, अशी टीका करतानाच राज्यातून इंडिया आघाडीचे ३० ते ३५ खासदार निवडून येतील, असा विश्वास खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त खा. शरद पवार गुरुवारी साताऱ्यात आले होते. अभिवादनानंतर त्यांनी राष्ट्रवादी भवन येथे माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि एमआयएम या तीन पक्षांचे मिळून सहा खासदार निवडून आले. यंदा परिस्थिती वेगळी आहे. इंडिया आघाडीला महाराष्ट्रातून प्रचंड समर्थन मिळत असून, आघाडीचे ३० ते ३५ उमेदवार यंदा निवडून येतील. महाराष्ट्रात मिळणारे समर्थन पाहूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास गायब झाल्याची टीका पवार यांनी केली.
इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार अजून निश्चित झाला नसल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली होती. याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, अमित शाह सांगतात त्यात काही अर्थ नाही. त्यांच्याच पक्षाचे मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले तेव्हा पंतप्रधान पदाचा उमेदवार कुठे ठरला होता? काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या चर्चेबाबत छेडले असता ते म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे दोन्ही पक्ष २००१ पासून सोबत काम करत आहेत. दोन्ही पक्षांची विचारधारा एक आहे. आम्ही लोकसभेच्या निवडणुकाही एकत्रित लढविल्या आहेत. दोन्ही पक्षांनी एकत्र काम करणे गरजेचे असून, यापुढेही आम्ही एकत्र काम करणार आहोत. त्यामुळे विलीनीकरणाचा प्रश्नच येत नाही.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, सारंग पाटील, दीपक पवार आदी उपस्थित होते.
भाजपसोबत जाण्याचा निर्णय नव्हता..
भाजपसोबत जाण्याचा निर्णय पवार साहेबांनी घेतला होता, असे अजित पवार म्हणाले होते. माध्यमांनी या प्रश्नाबाबत छेडले असता शरद पवार म्हणाले, आमचा कोणताही निर्णय भाजप सोबत जाण्याचा नव्हता. आमची व भाजपची विचारधारा वेगळी आहे. आमच्यातील काही सहकारी भाजपमध्ये जाण्याच्या विचाराचे होते. मात्र, तो काही पक्षाचा निर्णय नव्हता.