नरेंद्र मोदी देशात हुकूमशाही आणतील, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 12:58 PM2023-09-19T12:58:21+5:302023-09-19T12:59:30+5:30
निवडणुका घ्या, जनता तुम्हाला जागा दाखवेल
कऱ्हाड (सातारा) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. हे नजरेआड करून पाच राज्ये आपल्या हातातून जातील, या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणुका मुदतीआधी घेतील. त्यामुळे दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी जनतेने सज्ज राहावे, असे सांगून देशात लोकशाही राहते की नाही यात शंका वाटते. नरेंद्र मोदींची पावले त्या दिशेने चालू आहेत. तिसऱ्यांदा पंतप्रधान आपणच व्हावे, याकरिता ते इतर हुकूमशाही देशांचे अनुकरण करत ‘एक देश, एक निवडणूक’ ही पद्धत आणतील, अशी भीती राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
कऱ्हाड दक्षिण काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या जनसंवाद यात्रेनंतर शेरे येथील जाहीर सभेत चव्हाण बोलत होते. चव्हाण म्हणाले, काँग्रेसने माणूस म्हणून प्रत्येकाला वागणूक दिली. गुलामगिरीतून हा देश बाहेर काढून महासत्ता करण्याची शक्ती देशाच्या राज्यघटनेत आहे. समता, मानवता तोडण्याचा या मूठभर लोकांचा डाव आहे. त्यांचा मोदी हा चेहरा पुढे असला, तरी त्यांचा बोलवता धनी आरएसएस आहे. त्यांच्या मागे आपली माणसे धावत आहेत.
सत्तेसाठी नरेंद्र मोदी कोणत्याही थराला जातील. केंद्र सरकारने अब्जावधी रुपये जाहिरातीवर खर्च करूनही सामान्य लोकांच्या परिस्थितीत फरक पडलेला नाही. केंद्र सरकारने देशातील मालकीच्या मालमत्ता विकल्या व काहींचे खासगीकरण केले. रेल्वेची ९० हजार हेक्टर जमीन लिलावात काढली आहे.
निवडणुका घ्या, जनता तुम्हाला जागा दाखवेल
चव्हाण म्हणाले, मी मंत्री असेल तरच विकास होईल, असे काही नेते सांगतात; पण विकास समाजाचा की, स्वतःचा करायचा? तुरुंगातून बाहेर यायचे होते का. राज्यातील विश्वासघातकी सत्तेला जनता कधीही आशीर्वाद देणार नाही. गद्दार व लाचारांचे राज्य झाल्याचे वाईट वाटते. खोकी घेऊन सरकार पाडले; पण आता तुम्ही निवडणुका घ्या. जनता तुम्हाला जागा दाखवेल.