उदयनराजेंपेक्षा नरेंद्र पाटील यांचा खर्च मोठा; प्रचारावर खर्च केली 'इतकी' रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 07:53 PM2019-07-04T19:53:33+5:302019-07-04T19:58:21+5:30
सातारा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र्र पाटील यांचा निवडणूक खर्च राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्यापेक्षा जास्त झाला आहे.
सागर गुजर।
सातारा : सातारा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र्र पाटील यांचा निवडणूक खर्च राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्यापेक्षा जास्त झाला आहे. पाटील यांनी ६४ लाख ९७ हजार १३९ रुपये तर खासदार उदयनराजे भोसले यांनी ५९ लाख ६८ हजार ८०७ रुपये निवडणूक खर्च केला आहे. विशेष म्हणजे सर्वात जास्त खर्च करूनही पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.
जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या सर्व उमेदवारांकडून खर्च मागवून घेतला होता. खर्चाचा अंतिम तपशील जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फेराज्य निवडणूक विभागाकडे सादर करण्यात आला आहे. या निवडणुकीत शैलेंद्र वीर यांनी १५ लाख २१ हजार ७८४ रुपये खर्च केला. वंचित बहुजन आघाडीचे सहदेव ऐवळे यांनी ६ लाख ६३ हजार १३७ रुपये, पंजाबराव पाटील यांनी २ लाख ९२ हजार ६४५, बहुजन समाज पार्टीचे आनंदा थोरवडे यांनी ८६ हजार ३१०, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे दिलीप जगताप यांनी १ लाख ६८ हजार ८२२, अभिजित बिचुकले यांनी १७ हजार ३२५, सागर भिसे यांनी १४ हजार ४२५ रुपये खर्च केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप यांच्या महायुतीतर्फे जोरदार प्रचार करण्यात आला. महायुतीने सातारा लोकसभा मतदार संघाची जागा प्रतिष्ठेची बनवली होती. तर राष्ट्रवादीसाठी ही अस्तित्वाची लढाई होती. त्यामुळे दोन्ही बाजूंनी जोर लावण्यात
आला होता.
प्रचाराचे आधुनिक साहित्य, प्रचाराची वाहने, कार्यकर्त्यांसाठी जेवणावळ्या, प्रचारफेऱ्या, दुचाकी, चारचाकी वाहनांच्या रॅली यासाठी मोठा खर्च करून उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन केले.
निवडणुकीत नरेंद्र पाटील बाजी पालटणार, शिवसेनेचा भगवा २0 वर्षांनंतर पुन्हा साताºयात फडकणार, अशा चर्चेला ऊत आला होता. मात्र ही चर्चा सपशेल फोल ठरली. या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले ५ लाख ७९ हजार २६ मते मिळवून विजयी झाले तर ४ लाख ५२ हजार ४९८ मते मिळविणाºया नरेंद्र पाटील यांचा पराभव झाला होता.
नऊ उमेदवारांचा १५ कोटींपेक्षा जास्त खर्च
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना ७० लाख रुपये इतकी खर्चाची मर्यादा देण्यात आली होती. नऊपैकी एकाही उमेदवाराने ही मर्यादा ओलांडलेली नाही. सर्व उमेदवारांचा निवडणुकीतील एकूण खर्च १५ कोटी २ लाख ३० हजार ३९४ रुपये इतका झाला आहे.