नरेंद्र पाटलांची झप्पी... उदयनराजेंची पप्पी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:31 PM2019-03-31T23:31:15+5:302019-03-31T23:31:20+5:30

दीपक शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : साताऱ्याचे राजकारण भल्याभल्यांना चक्रावून टाकते. कधी कोण कोणती चाल खेळेल? हे ...

Narendra Patil's Jhappi ... Udayanaraja's Pappi | नरेंद्र पाटलांची झप्पी... उदयनराजेंची पप्पी

नरेंद्र पाटलांची झप्पी... उदयनराजेंची पप्पी

Next

दीपक शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : साताऱ्याचे राजकारण भल्याभल्यांना चक्रावून टाकते. कधी कोण कोणती चाल खेळेल? हे कधीच सांगता येत नाही. शिवेंद्रसिंहराजेंच्या वाढदिवसानिमित्त लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी करणा-या दोन्ही उमेदवारांचे प्रेम उफाळून आले. शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी शिवेंद्रसिंहराजेंना झप्पी दिली... तर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी पप्पी दिली. त्यामुळे साताऱ्याच्या राजकारणात शेरास सव्वाशेर याचाच प्रत्यय आला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक आमदार आणि स्थानिक नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. कधी एकमेकांना गोड बोलून तर कधी एकमेकांची खोड मोडून त्याला आपल्याजवळ येण्यास भाग पाडण्यात काही राजकारणी माहीर आहेत. लोकसभा निवडणूक जाहीर होताच हे डावपेच आखले गेले. एकाने सांगायचे की जे मी बोलते ते मी करतोच... दुसºयाने सांगायचे जे मी बोलतो ते मी करतोच; पण जे बोलत नाही ते जाणीवपूर्वक करतो. एकमेकांवर असे सूचक वार करून खिंडीत पकडण्याचा प्रयत्नही केला जातोय.
सातारा आणि जावळी मतदार संघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सध्या दोन्ही आमदारांच्या हिट लिस्टवर आहेत. त्यांना प्रत्येकवेळी चुचकारण्याचा प्रयत्न दोन्ही उमेदवारांकडून होत आहे. कधी शिवेंद्रसिंहराजेही अशी खेळी करतात की दुसºया उमेदवाराला आपल्याकडे आल्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यावेळी त्यांचे जे मी बोलत नाही ते जाणीवपूर्वक करतो, या राजकारणातील डावाची आठवण होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे मनोमिलन घडवून आणण्यापूर्वी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नरेंद्र पाटील हे खासदारकीचे संभाव्य उमेदवार असतील, असे गृहित धरून त्यांना मिसळ खाण्यासाठी आमंत्रित केले. शिवेंद्रसिंहराजेंची ही खेळी तेव्हाच सगळ्यांच्या भुवया उंचावून गेली. आता शिवेंद्रसिंहराजे काही ऐकणार नाहीत, हे अनेकांनी जाणून घेतले; पण शरद पवारांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे मन वळाले, असे ते बोलतात; पण ते जे बोलत नाहीत ते जाणीवपूर्वक करतात, याचेही भान ठेवणे आवश्यक आहे.
शिवेंद्रसिंहराजेंचा वाढदिवस ही दोन्ही उमेदवारांसाठी पर्वणीच ठरली. त्यामुळे सेना-भाजप युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कार्यकर्त्यांची विचारपूस करण्यापेक्षा अगोदर शिवेंद्रसिंहराजेंना जावळीतच गाठले. ‘एकच राजे...शिवेंद्रराजे’ अशी घोषणा देत त्यांना नरेंद्र पाटलांनी झप्पी दिली. ‘शिवेंद्रसिंहराजे हे आमचे चांगले मित्र आहेत. जावळी खोºयातील अनेकजण माथाडी कामगार असलेले त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यांना मुंबईत येणाºया अडचणी आम्ही सोडवत असतो. त्यामुळे त्यांची मैत्री अधिक वाढली आहे,’ असेही पाटील यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आल्याचे नरेंद्र पाटील यांनी दाखविले; पण दाखविणे आणि असणे यामध्ये फार मोठे राजकारण आहे, हे आता लोकही समजून घेऊ लागले आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कामाला लागा म्हणून सूचना देणारा मेळावा नुकताच सातारा शहरातील एक हॉलमध्ये झाला. त्यावेळी अनेकांनी उदयनराजे जशी कॉलर उडवितात, तशीच त्यांची पप्पीही प्रसिद्ध आहे. त्यामुळे कधीतरी त्यांनी पप्पीही द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. उदयनराजेंना ही संधी चालून आली. शिवेंद्रसिंहराजे भोसलेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या गराड्यात उदयनराजे हे शिवेंद्रसिंहराजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले. त्यावेळी एवढ्या लोकांसोबत कोण आले म्हणून सर्वच जणांना आश्चर्य वाटले. शिवेंद्रसिंहराजेंनी तर हे बोलूनच दाखवले. शिवेंद्रसिंहराजेंचा वाढदिवस आणि राजघराण्यातील ज्येष्ठ व्यक्ती भेटण्यासाठी आली म्हटल्यावर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही आदबीने उदयनराजेंना वाकून नमस्कार केला. ते पाहून भारावलेल्या आणि अगोदरच 'भावनिक' असलेल्या उदयनराजेंनी त्यांना प्रेमाने जवळ घेतले आणि त्यांची पप्पी घेतली. राजकारणाशिवायही या घटनेला अनेक संदर्भ असतील; पण सध्यातरी झप्पीपेक्षा पप्पीला अधिक भावना चिकटलेल्या दिसतात; पण निवडणुकीत काय होते? यावरच जोर झप्पीचा का पप्पीचा? हे ठरणार आहे.
झप्पी मोठी का पप्पी
शिवेंद्रसिंहराजेंचा वाढदिवस आणि राजघराण्यातील ज्येष्ठ व्यक्ती भेटण्यासाठी आली म्हटल्यावर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही आदबीने उदयनराजेंना वाकून नमस्कार केला. ते पाहून भारावलेल्या आणि अगोदरच 'भावनिक' असलेल्या उदयनराजेंनी त्यांना प्रेमाने जवळ घेतले आणि त्यांची पप्पी घेतली. राजकारणाशिवायही या घटनेला अनेक संदर्भ असतील; पण सध्यातरी झप्पीपेक्षा पप्पीला अधिक भावना चिकटलेल्या दिसतात; पण निवडणुकीत काय होते? यावरच जोर झप्पीचा का पप्पीचा? हे ठरणार आहे.

Web Title: Narendra Patil's Jhappi ... Udayanaraja's Pappi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.