राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:22 AM2019-11-19T00:22:21+5:302019-11-19T00:22:36+5:30
प्रगती जाधव-पाटील । सातारा : राष्ट्रीय महामार्गावरील शेंद्रे ते शिरवळ रस्त्यावरील खड्डे मुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. ...
प्रगती जाधव-पाटील ।
सातारा : राष्ट्रीय महामार्गावरील शेंद्रे ते शिरवळ रस्त्यावरील खड्डे मुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करून या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना सुरक्षेबरोबरच सोयीही उपलब्ध करून देऊ, असे स्पष्टीकरण रिलायन्सचे आपत्कालीन विभाग महामार्ग अधिकारी संकेत गांधी यांनी केले आहे.
महामार्गावरील असुविधांबरोबरच त्रुटींबाबत ‘लोकमत’ने ‘असुविधांचा महामार्ग’ अशी वृत्तमालिका सुरू केली होती. खेडशिवापूर ते हुबळी या महामार्गावरील उपलब्ध सोयींबरोबरच सत्यस्थिती मांडण्यात आली होती. याची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने स्पष्टीकरण करण्यात आले आहे.
गांधी म्हणाले, ‘महामार्गावर प्रवाशांना सुरक्षित प्रवास देणं हे आमचं प्रमुख कर्तव्य आहे; पण यंदाच्या उच्चांकी पावसाने रस्ता खूपच खराब झाला. पाऊस सुरू असतानाच अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये आम्ही पेव्हर टाकून तात्पुरती दुरुस्ती केली आहे. शिरवळ ते शेंद्रे या ७० किलोमीटरच्या महामार्गावर एकही खड्डा दिसणार नाही, अशा पद्धतीने पॅचिंगचे काम सुरू करण्यात येणार आहे. रुग्णवाहिका, क्रेन, पेट्रोलिंग गाडी यांचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्याद्वारेही प्रवाशांना आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्याची नोंद उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत, तिथं पेव्हर टाकून पॅचिंग करण्यात आले होते. आता या खड्ड्यातील पेव्हर काढून त्यात डांबर टाकून या रस्त्यांचे ‘मिलिंग’ करण्यात येणार आहे. हे काम वेळ खाऊ असल्यामुळे ते पूर्ण व्हायला थोडा अवधी लागू शकतो; पण सुरक्षित प्रवासासाठी हे तितकेच उपयुक्तही आहे. महामार्गावर कुठंही खड्डे दिसणार नाहीत, याची खबरदारी आम्ही घेणार आहे.
पावसामुळे महामार्गावर पेव्हर पॅचिंग!
यंदा उच्चांकी पाऊस झाला. परिणामी रस्त्यांची दुर्दशा झाली. कोसळत्या पावसात अपघात टाळण्यासाठी ऐनवेळीची तरतूद म्हणून महामार्गावरील मोठ्या खड्ड्यांमध्ये पेव्हरचे पॅचिंग करण्यात आले. ज्या खड्ड्यांमध्ये पेव्हर आहेत, त्यात पुन्हा डांबर टाकून दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती ‘रिलायन्स’चे देखभाल दुरुस्तीचे अधिकारी संजयकुमार सिंग यांनी दिली.
अल्टिमेटम गाठणारच !
साताºयाचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत पुण्यात झालेल्या बैठकीत आम्ही डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे अल्टिमेटम दिले होते. त्यानुसार आमची कार्यवाही सुरू झाली आहे. ५० कामगारांच्या साथीने शेंद्रे ते शिरवळ रस्त्याचे काम सुरू आहे.