राष्ट्रवादीकडून ‘मिशन’ लोकसभेची व्यूहरचना

By admin | Published: March 22, 2017 10:33 PM2017-03-22T22:33:31+5:302017-03-22T22:33:31+5:30

उदयनराजेंवर कुरघोडी : रामराजे, शिवेंद्रसिंहराजेंना पवारांकडून बळ: संजीवराजेंना डावलण्याचे धाडस कोणालाही झाले नाही

National Mission to the Mission '' Mission '' Lok Sabha Convention | राष्ट्रवादीकडून ‘मिशन’ लोकसभेची व्यूहरचना

राष्ट्रवादीकडून ‘मिशन’ लोकसभेची व्यूहरचना

Next

सागर गुजर -सातारा -जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपद निवडताना बारामतीकरांचा खलिताच महत्त्वाचा असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. पदाधिकारी निवडीवर बारामतीकरांचाच अंकुश आहे, आणि ते निवडण्यामागचे दूरगामी धोरणही असते, हे राष्ट्रवादी पक्षाने दाखवून दिले आहे. पदाधिकारी निवडताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ‘मिशन’ लोकसभेची व्यूहरचना आखली आहे. रामराजे नाईक-निंबाळकर व लक्ष्मणराव पाटील या दोघांचे पक्षावर पहिल्यापासूनच वर्चस्व राहिले. या दोन्ही नेत्यांनी फलटणसह वाई-खंडाळा-महाबळेश्वर या मतदार संघांवर पूर्ण प्राबल्य मिळविले आहे. रामराजे व लक्ष्मणतात्या या दोन नेत्यांचा शब्द राष्ट्रवादीत प्रमाण मानला जातो. त्यात आणखी एका नेत्याची म्हणजे सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भर पडली आहे. पाटणकर सरकार तसे पवारांच्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक! पाटणला विधानसभा राष्ट्रवादीच्या ताब्यात नाही. त्यामुळे आपल्या तालुक्याला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद मिळावे, अशी अपेक्षा पाटणकरांनी ठेवली होती. चर्चेतही नसलेल्या राजेश पवारांना थेट उपाध्यक्षपदावर संधी मिळण्याचे चिन्ह होते.
पाटणकरांनी थोरल्या पवारांशी बोलून पवारांचे पद ‘फिक्स’ करून टाकले होते. पण पवारांच्या हातातोंडाशी आलेला घास खुद्द पवारांनीच मानकुमरेंच्या तोंडात घातला. त्याला कारणही तसे घडले! साताऱ्याचे धाकटे राजे गरजले. ‘जावळी तालुक्याला उपाध्यक्षपद मिळालेच पाहिजे,’ असा हट्ट त्यांनी धरला. दगडं आम्ही झेलायची, खासदारांशी आम्ही दोन हात करायचे आणि पद इतरांना हा अन्याय असल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जावळी तालुक्याला उपाध्यक्षपद देणे कसे योग्य आहे, हे शिवेंद्रसिंहराजेंनी थोरल्या पवारांना पटवून दिले आणि भाकरी फिरली.
राष्ट्रवादीमध्ये रामराजेंचा शब्द प्रमाण आहे. बारामतीकरांइतकाच रामराजेंच्या शब्दाला किंमत आहे. ज्यांनी रामराजेंना विरोध केला ते आज एकतर पक्ष सोडून गेलेत अथवा त्यांचे पंखच छाटले गेलेत. त्यांचे बंधू संजीवराजे नाईक-निंबाळकर सहाव्यांदा जिल्हा परिषदेत निवडून गेलेत. शांत, संयमी व साधेपणा ही त्यांची गुणवैशिष्ट्ये असल्याने त्यांचेही राष्ट्रवादीमध्ये आदराचे स्थान आहे. अध्यक्षपदासाठी संजीवराजेंचे नाव पुढे आल्यानंतर त्यांना विरोध करण्याचे धाडस कुणालाही झाले नाही. आम्हाला अध्यक्षपद द्या, अशी मागणी मानसिंगराव जगदाळे व वसंतराव मानकुमरे या दोघांनी केली होती. पण संजीवराजेंना डावलून आम्हाला पद द्या, अशी मागणी करण्याचे धाडस कुणी दाखविले नाही.
रामराजेंनी नवनियुक्त सदस्यांना पक्षनिष्ठेचे शब्द पहिल्याच दिवशी सुनावले आहेत. रामराजेंशी पंगा घेऊन सवतासुभा मांडणाऱ्यांना पक्षाने बाहेर जाण्याची दारे उघडी करून ठेवली आहेत. त्यामुळे रामराजे व शिवेंद्रसिंहराजे या दोन्ही राजेंना बारामतीकरांनी बळ देण्याचे ठरविल्याचे प्रथमदर्शनी तरी पाहायला मिळत आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर निर्विवाद वर्चस्व ठेवून असलेला राष्ट्रवादी पक्ष जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने आणखी धष्टपुष्ट बनला आहे. काँगे्रस गलितगात्र झाली, तर शिवसेनेचीही मर्यादा पाटणपर्यंतच सीमित राहिल्याचे दिसून आले. मोदी-फडणवीसांच्या प्रतिमा पुढे करून मते मागणाऱ्या भाजपचे डावपेचही पूर्णत: उधळले गेले.
१९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. पवारांची अस्मिता ही सातारा जिल्ह्याची अस्मिता आहे, हे समजूनच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काम केले. विधानसभेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांनी पवारांचे हात बळकट करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली. याच मेहनतीचे फळ राष्ट्रवादीला जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. पाटण व कऱ्हाड दक्षिण वगळता इतर सर्वच विधानसभा मतदार संघांचे नेतृत्व राष्ट्रवादीकडे आहे. दिवसेंदिवस राष्ट्रवादीविरोधकांची ताकद क्षीण होत असल्याचे समोर येत आहे. देशात व केंद्रात सत्तेवर असणारी भाजप अजूनही बाळसे धरण्यात कमी पडल्याचे सातत्याने जाणवत आहे. याउलट हाताचे अस्तित्वही धूसर झाल्याचे पाहायला मिळत आहे.
जिल्हा परिषदेची निवडणूक लढायची म्हटल्यावर पहिल्यांदा ग्रामपंचायती, विकास सेवा सोसायट्यांवरही प्राबल्य मिळवायला हवे, हे समीकरण राष्ट्रवादीला चांगले माहीत आहे. मात्र, शिवसेना व भाजपला ग्रामपंचायतींच्या निवडणुकांतही यश आले नसल्याने जिल्हा परिषदेचे अवघड गणित त्यांना भलतेच जड गेले. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांआधीच राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. राष्ट्रवादीला विरोध करणे इतर पक्षांसाठी आता सोपे राहिलेले नाही.


शेंद्र्यातल्या मेळाव्यापासूनच मनसुब्यांची आखणी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीआधी शेंद्र्यात अजिंक्यतारा सहकारी कारखान्याच्या कार्यस्थळावर राष्ट्रवादीचा भव्य शेतकरी मेळावा झाला. या मेळाव्यात दस्तुरखुद्द शरद पवारांची प्रमुख उपस्थिती होती. रामराजे, शशिकांत शिंदे व शिवेंद्रसिंहराजे भोसले या तिघांनीही खासदार उदयनराजे भोसले यांच्या कारनाम्यांचे पाढे या मेळाव्यात वाचले. विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार असतानाही उदयनराजेंनी घेतलेली पक्षविरोधी भूमिका, पक्षाच्या स्थानिक नेत्यांवर उदयनराजेंकडून होत असलेले आरोप याच्या तक्रारी या मेळाव्यात मांडण्यात आल्या. उदयनराजेंना बाजूला करून निवडणुका लढा, असा आदेशच पवारांनी या सर्वांच्या तक्रारी ऐकल्यानंतर केला होता. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न खासदार उदयनराजेंनी केला, पण त्यांची मर्यादा सातारा तालुक्यापर्यंतच सीमित राहिली. उदयनराजेंविरोधातील मिशन आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी इतर सहकारी नेत्यांच्या मदतीने जोमाने सुरू ठेवले आहे.


जिल्हा परिषदेचे पदाधिकारी निवडताना आमदार शशिकांत शिंदे व आमदार मकरंद पाटील यांनी संयमी भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. साताऱ्याच्या थोरल्या राजेंविरोधात फलटणकर राजे आणि साताऱ्याचे
धाकटे राजे यांनी तलवारी परजल्या असल्याने यात आपले विळे, कोयता कशाला नाचवायचे?, हे वास्तव
स्वीकारून शशिकांत शिंदे व मकरंद पाटील यांनी संयम
बाळगत अध्यक्ष व उपाध्यक्षपदासह सभापती मिळविण्यासाठी
घाई केलेली नाही.

Web Title: National Mission to the Mission '' Mission '' Lok Sabha Convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.