सकाळी राष्ट्रवादी; दुपारी भाजपचे जलपूजन

By admin | Published: March 27, 2017 11:57 PM2017-03-27T23:57:20+5:302017-03-27T23:57:20+5:30

वसना पाणी योजनेवरून श्रेयवाद : पक्षविरहित काम करून प्रथम जनतेची तहान भागवा; ग्रामस्थांची अपेक्षा

Nationalist in the morning; At the BJP's Half Pooja at noon | सकाळी राष्ट्रवादी; दुपारी भाजपचे जलपूजन

सकाळी राष्ट्रवादी; दुपारी भाजपचे जलपूजन

Next



वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागला वरदान ठरणाऱ्या वसना उपसा सिंचन योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. योजनेचे केवळ २० टक्के काम शिल्लक असताना या योजनेच्या निधीचे आता राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये श्रेयवादी राजकारण सुरू झाले आहे. याची प्रचिती सोमवारी आली. राष्ट्रवादीच्या वतीने सकाळी तर भाजपकडून दुपारी वसनेच्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले. एकाच दिवशी दोनवेळा जलपूजन झाल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे.
या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून सध्या पाणी सोडण्यात येत आहे. मात्र, हे पाणी आमच्याच पक्षाच्या भूमिकेमुळे मिळाल्याच्या वल्गना करत शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषद सदस्य मंगेश धुमाळ व त्यांच्या समवेत उपसभापती संजय साळुंखे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कदम यांनी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे यांच्या आदेशानुसार या पाण्याचे विधिवत जलपूजन केले. तर वसना प्रकल्पसाठी सहकारमंत्री चंद्रकात पाटील, भाजपचे आमदार योगेश सागर यांच्या प्रयत्नातून या योजनेस भरीव निधी मंजूर झाला असल्याचे जाहीर करत वसनेच पाणी हे भाजपमुळेच मिळाल्याचा आनंद व्यक्त करीत भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि घोषणाबाजी करीत या पाण्याचे जलपूजन केले.
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील वसना व पूर्व भागातील वांगना या दोन्ही स्वतंत्र पाणी योजनांचे एकत्रित भूमिपूजन समारंभ ९ मे २००० रोजी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते नांदवळ येथे आहे. असे असताना गेल्या १७
वर्षांत ज्या गतीने या योजनांची
कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे ती कामे झाली नसल्याने केवळ ७८ कोटींमध्ये पूर्णत्वास येणारी वसना सिंचन योजना आज १३५ कोटींवर गेली. मात्र, अजूनही ही योजना पूर्णत्वास आली नाही. आजअखेर या योजनेचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले असून
उर्वरित २० टक्के काम पूर्ण होण्यासाठी शासनाने एकत्रित ४५ कोटींची तरतूद केल्यास ही संपूर्ण योजना एकाच वर्षात पूर्ण करण्याचा विश्वास या योजनेच्या ठेकेदाराकडून व्यक्त होत आहे.
असे असले तरी सध्या या योजनेच्या निधीबाबत अजूनही केवळ घोषणाच होत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यासाठी ४५ कोटींचा निधी तर भाजप सरकारने या आर्थिक वर्षात २० कोटींचा निधी मंजूर केल्याची
घोषणा केली आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणताच अधिकृत आदेश अद्यापतरी हातात नसल्याचीच परिस्थिती दिसत आहे.
दरम्यान, सोमवारी भाजपचे कार्यकर्ते या पाण्याचे पूजन करणार ही वार्ता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना समजताच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळीच देऊर येथील पंपहाऊस व शहापूर वितरण हौदाजवळील पाण्याचे पूजन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मंगेश धुमाळ, कोरेगाव पंचायत समिती उपसभापती संजय साळुंखे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कदम, पंचायत समिती सदस्या साधना बनकर उपस्थित होते. तर दुपारी भाजपचे महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जलपूजन करण्यात आले. अनपटवाडी सरपंच मनोज अनपट, दीपक पिसाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम, राजेंद्र धुमाळ, मनोज कलापट, महेश अनपट यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
१७ वर्षे रखडलेल्या या योजनेच श्रेयवादी राजकारण करण्यापेक्षा ही योजना लवकर पूर्ण होण्यासाठी पक्षविरहित काम करून येथील दुष्काळाने कोरड पडलेल्या जनतेची तहान भागवा, अशी अपेक्षा परिसरातील ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Nationalist in the morning; At the BJP's Half Pooja at noon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.