बालेकिल्ल्यातील राष्ट्रवादीला बदलाचे वेध!
By admin | Published: June 29, 2017 07:02 PM2017-06-29T19:02:08+5:302017-06-29T19:02:08+5:30
राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीसह विविध शाखांचे पदाधिकारी बदलण्यात येणार आहेत.
ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 29 - राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीसह विविध शाखांचे पदाधिकारी बदलण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार ४ जुलै रोजी साताऱ्यात येऊन स्वत: नव्या निवडींची घोषणा करणार आहेत. केंद्र व राज्यात सत्ता गमावली असली तरी राष्ट्रवादीने सातारा जिल्ह्यात मात्र आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषद, दहा पंचायत समिती, नगरपंचायती व नगरपरिषदांमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे. साताऱ्याचा सुभा ताब्यात असल्याने राष्ट्रवादीत कार्यरत असणाऱ्या बहुतांश मंडळींनी डबक्यातच सुख मानले असल्याचे पुढे येत आहे. राष्ट्रवादीचे नेते व विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या प्रवृत्तीबाबत नुकतीच नाराजी व्यक्त केली आहे.
सत्तेवर नसताना राष्ट्रवादीने प्रबळ विरोधकाची भूमिका बजावणे आवश्यक असताना पक्षाचे बिनीचे शिलेदार म्हणवून घेणारे केवळ कागदी विरोध करत असल्याची नाराजी रामराजेंनी व्यक्त करुन अशा प्रवृत्तीचे काम उपटले होते. साहजिकच जिल्हा कार्यकारिणीसह युवक, महिला, विद्यार्थी, अल्पसंख्यांक सेल आदी शाखांवर नव्याने नेमणुका केल्या जाणार आहेत. जी मंडळी पक्षाच्या नावावर दुकानदाऱ्या करत आहेत, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून पक्षासाठी काम करु इच्छिणाऱ्या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. तसेच जिल्हा कार्यकारिणीमध्ये उल्लेखनीय काम केलेल्या पदाधिकाऱ्यांना प्रदेश कमिटीवर काम करण्याची संधी दिली जाणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी युवक आघाडी, विद्यार्थी संघटना, महिला आघाडी तसेच अल्पसंख्यांक सेलसाठी काम करु इच्छिणाऱ्यांचे अर्ज राष्ट्रवादीने मागवले होते. त्यानुसार इच्छुकांनी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्याकडे अर्ज सादर केले आहेत. राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे व इतर मंडळींनी या नावांची माहिती घेतली आहे. ४ जुलै रोजी सायंकाळी 5 ते 5.30 यावेळेत जिल्हा कार्यकारिणीसह इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या जाणार आहेत. जिल्हा कार्यकारिणीमध्ये निवड व्हावी, यासाठी अनेकांनी लॉबिंग सुरु केले आहे.
मदनआप्पांच्या नातवासह सात जणांची चर्चा
वाईचे माजी आमदार व मंत्री दिवंगत मदनराव पिसाळ यांचे नातू अॅड. विजयसिंह पिसाळ यांच्यासह विद्यार्थी काँगे्रसचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब महामुलकर, जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे, गोरखनाथ नलवडे, नगरसेवक बाळासाहेब खंदारे, पारिजात दळवी, विजय कुंभार हे राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.
चमकोगिरी करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता
राज्यातील नेतेमंडळी साताऱ्यात येतात, तेव्हा अनेकजण व्यासपीठावर चमकोगिरी करताना पाहायला मिळतात. राष्ट्रवादीच्या पदाची झूल पांघरुन रुबाबात राहणाऱ्यांना नेतेमंडळींकडून बाहेरचा रस्ता दाखविला जाणार असल्याची चर्चा आहे.
जन्म दाखला पाहूनच युवकाध्यक्षाची निवड
राष्ट्रवादी युवक काँगे्रसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी वय ३२ वर्षांची तर विद्यार्थी काँगे्रससाठी २७ वयाची अट आहे. या निवडी करताना अजित पवार यांनी संबंधितांचे जन्मदाखले मागवले आहेत. ४ जुलै रोजी जन्मदाखला पाहूनच ते निवडी जाहीर करणार आहेत.
५३ सदस्य करणार मतदान
जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांतून निवडलेले प्रत्येकी ६ सदस्य असे ४८ सदस्य व स्विकृत ५ असे मिळून एकूण ५३ सदस्य जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी मतदान करणार आहेत.