वाईच्या कृष्णा नदीला आले धोबी घाटाचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:36 AM2021-04-13T04:36:58+5:302021-04-13T04:36:58+5:30
वाई : पाडव्याच्या मुहूर्तावर वाकळा धुण्याची लगबग सुरू झाली असून, वाईच्या कृष्णा नदीला धोबी घाटाचे स्वरूप आले आहे. ...
वाई : पाडव्याच्या मुहूर्तावर वाकळा धुण्याची लगबग सुरू झाली असून, वाईच्या कृष्णा नदीला धोबी घाटाचे स्वरूप आले आहे. पाडवा हा सन साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. पाडव्याच्या तोंडावर नागरिक घराची स्वच्छता करून वाकळा धूत असतात. घरातील देवतांसह कपडे, भांडी कृष्णा नदीवर आणून स्वच्छ धुवून मगच पाडव्याच्या उत्सवाला सुरुवात करतात.
अस्वच्छतेच्या विळख्यात कृष्णामाई अडकली आहे. कृष्णामाई स्वच्छतेसाठी वाईतील ज्या संस्थांनी, संघटनांनी, नगरपालिकेने जे अहोरात्र कष्ट उपसले ते वाया गेल्याची भावना वाईकरांमधून व्यक्त करण्यात येत आहे. संपूर्ण घाटावर धुतलेल्या वाकळा, ब्लँकेट, चादरी
वाळत टाकल्याने कपड्याचे आच्छादन निर्माण झाले होते. ज्या स्वच्छ पाण्यात राज्यभरातून आलेले नागरिक आंघोळ करीत आनंद घेत आहेत, ती स्वच्छता करण्यासाठी सेवा कार्य समितीने किती कष्ट उपसले आहेत. याची जाणीव या लोकांनी अस्वच्छता करताना लक्षात घेणे काळाची गरज आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून याबाबत ठोस उपाय योजना करण्याचे गरज निर्माण झाली आहे. सण-उत्सवाच्या पूर्वसंध्येला पालिकेने गार्ड उभे करून कपडे धुण्यास मज्जाव करणे आवश्यक आहे. कृष्णा नदीला धोबी घाटाचे स्वरूप तर आले आहेच; परंतु नदीतून वाहणारे स्वच्छ पाणी अस्वच्छ होऊन त्याला ओंगळ स्वरूप आले आहे. अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण होत आहे. वाईला प्रसिद्ध संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत महागणपतीचे मंदिर याच घाटावर आहे.
लोकांनी कृष्णा नदी प्रदूषणमुक्त केली. कृष्णा नदी सेवा कार्य समिती गेल्या पाच वर्षांत दर रविवारी नदीवरील प्रत्येक घाटावर स्वच्छतेसाठी राबत असून, नदीवर घरातील कपडे धुऊन ती अस्वच्छ करण्यासाठी लोक पुढे येताना दिसत आहेत. या परंपरेला लोकांनी बाजूला सारण्याची गरज आहे. नागरिकांनी स्वतःच्या घरातील कपडे घरातच धुऊन नदी प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी वाईकरांमधून जोर धरू पाहत आहे. तसेच पालिका प्रशासनाने ठोस उपाय करून लोकांना नदीत कपडे धुण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करावेत तरच ‘स्वच्छ वाहते, संथ वाहते कृष्णा माई’ हे ब्रीद वाक्य सत्यात उतरेल.
फोटो आहे :