अज्ञानाच्या वणव्यात निसर्गाची होरपळ...!
By admin | Published: April 21, 2017 10:29 PM2017-04-21T22:29:48+5:302017-04-21T22:29:48+5:30
सर्व स्तरामधून संतप्त प्रतिक्रिया : अटकाव करण्यासाठी वन विभागाकडून प्रबोधन आणि दंडाची तरतूद करणे आवश्यक
सातारा : उन्हाळा सुरू झाला की डोंगरांमध्ये वणवे लावण्याची विकृती अलीकडे जोर धरू लागली आहे. वणवे लावण्याने होणारे नुकसान कधीच न भरून येणारं आहे. अनेकदा पर्यटनासाठी म्हणून जंगलात फिरायला जाणारे आणि हातात स्मार्ट फोन घेऊन स्वत:ला खूपच हायटेक म्हणवणारेही वणवे लावण्यात आघाडीवर आहेत. उन्हाळ्यात आठवड्यातून किमान एकदा अजिंक्यतारा होरपळताना पाहून अनेक सातारकरांच्या कडा आजही ओल्या होतात. कारण अज्ञानामुळे लावण्यात आलेल्या या वणव्यांमुळे वन्यजीव मृत्युमुखी पडत आहेत.
अजिंक्यतारा किल्ल्याच्या खडकावर वनप्रेमींनी कष्टाने फुलविलेली झाडेही त्यात होरपळून जात आहेत. उन्हाळ्याबरोबर वणव्यांचे प्रमाण वाढते आणि या वणव्यात निसर्गाची अपरिमित हानी होते. वणव्यांबाबत वनविभाग बऱ्यापैकी प्रबोधन करतो; पण त्याचा परिणाम फारसा होताना दिसत नाही. आजही वणव्याचे प्रमाण वाढलेलेच आहे. रोज कोठेना कोठे वणव्यात निसर्ग संपत्ती भरडून जात आहे. वणव्याच्या दृश्य परिणामांपेक्षा त्याचे न दिसणारे परिणाम भयानक असतात. त्यात कधीही भरून न येणारी हानी होत असते म्हणूनच आता आपण काडीपेटी टाकून निसर्गाच्या संवर्धनाची कास धरायला हवी.
वाळलेल्या गवतातून वाऱ्याद्वारे उडून पडणारे बी सर्वत्र पसरलेले असते. ते बी पावसाला सुरुवात होताच जमिनीत रुजून गवत वाढीची क्रिया होत असते. मात्र, वणवे लावण्यामुळे जमिनीवर पसरलेले गवताचे बी जळून जाण्याने गवत चांगले कशाच्या साह्याने वाढणार, हे समजत नाही.
संपूर्ण गवत जाळण्यासाठी वणवे लावण्यामुळे किडे, मुंग्या, पाली, सरडे, पक्षी, साप व इतर सरपटणारे प्राणी असे असंख्य जीव वणव्याच्या आगीत होरपळून मरतात.
त्यामुळे वणवे विनाशकारी ठरत आहेत. वणवे लावले जाऊ नयेत, यासाठी वन विभागाने केवळ जनतेला आवाहन करणारे फलक लावून आपली जबाबदारी झटकण्यापेक्षा गावागावांत वणवाविरोधी पथके तयार करणे, त्याद्वारे जनतेची जागृती करणे, एखाद्या ठिकाणी वणवा लागला असल्यास या पथकाच्या साह्याने तो तत्काळ विझविणे, त्यासाठी या पथकांना प्रशिक्षण देणे, वणवा लावणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना कडक शिक्षा केल्यास त्यामुळे शिक्षेची भीती निर्माण होऊन वणवा लावणाऱ्यांना धाक निर्माण होईल. (प्रतिनिधी)
गैरसमज दूर करण्याची गरज...!
वणवा हा काही आपोआप लागत नसतो, तो कोणीतरी लावल्याशिवाय लागत नाही. हा वणवा लावण्यापाठीमागे अनेक अंधश्रद्धा आहेत. गवत जाळले की पुन्हा पुढील वर्षी तेथे जोमाने गवत येते असा समज आहे. त्या गैरसमजातून दरवर्षी डोंगर पेटविले जातात. या वणव्याने त्यांच्या समजुतीप्रमाणे रान चांगले भाजले जाते; पण त्या वणव्यात जमिनीचा पोत सुधारणारे कितीतरी जीवजंतू जळून खाक होतात. जमिनीतील वरच्या थरातील सेंद्रिय पदार्थही जळून जातात. वाढलेल्या, वाढीच्या अवस्थेतील वनस्पती, लहान पक्षी, प्राणी, त्यांची घरटी सारेकाही जळून जाते.
वणवे लावले जाऊ नयेत, यासाठी वन विभागाच्या वतीने विविध प्रयत्न केले जातात. नागरिकांचे प्रबोधन केले जाते. त्याशिवाय कायद्याचाही धाक दाखविला जातो. वणवा लागलाच तर तो फारसा पसरू नये, यासाठी अग्निरेखाही खोदल्या जातात. मात्र, तरीही दरवर्षी वणवे लागतातच.