सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात निसर्गप्रेमींना अनुभवता येणार बुद्ध पौर्णिमेची रात्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 01:03 PM2024-05-13T13:03:00+5:302024-05-13T13:03:24+5:30
निसर्गानुभव कार्यक्रमाचे आयोजन : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा उपक्रम
कोयनानगर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने गुरुवार, दि. २३ रोजी बुद्ध पौर्णिमेला ‘निसर्गानुभव कार्यक्रम २०२४’ राबविण्यात येणार आहे. इच्छुकांनी सहभागी होण्यासाठी सोमवार, दि. २० पर्यंत गुगल लिंक फाॅर्म भरून पाठवावेत, अशी आवाहन उपसंचालक कोयना वन्यजीव विभाग, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
सामान्य नागरिकांना रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ काढून त्यांना निसर्गाची अनुभूती घेता यावी, तेथे राहणाऱ्या वन्य पशुपक्ष्यांचे त्यांच्याच नैसर्गिक अधिवासात मनसोक्त दर्शन घेता यावे, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खुणांद्वारे ओळख पटविता यावी अशी निसर्गप्रेमींची इच्छा असते. रात्रीचे जंगल, वन्यप्राण्यांचे आवाज इत्यादी रंजक माहिती बौद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्री मिळावी या उद्देशाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातर्फे ‘निसर्गानुभव कार्यक्रम २०२४’ आयोजित केला आहे. बुद्ध पौर्णिमेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोयना व चांदोली या संरक्षित क्षेत्रातील जंगलात मचाणावर बसून निरीक्षण करता येणार आहे.
मागील काही वर्षांपासून कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून वन्यजीवांची गणना होत आहे. मात्र सामान्य लोकांना वने व वन्यजीव यांच्याबाबत माहिती मिळावी या उद्देशाने वनविभागात मागील काही वर्षांपासून निसर्गानुभव कार्यक्रम सुरू करण्यात आला. सद्यस्थितीत उन्हाळा सुरू आहे. वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार करण्यात आले आहेत. अशा पाणवठ्यांजवळ मचाण बांधण्यात आले आहेत.
गुगल फॉर्म लिंक १३ एप्रिल पासून उपलब्ध
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोयना व चांदोली या संरक्षित क्षेत्रातील जंगलात ६० हून अधिक मचाणावर बसून निसर्गप्रेमींना रात्रीच्या अरण्यवाचनाचा थरारक अनुभव घेता येणार. या मोहिमेत १८ वर्षांवरील व्यक्तीला सहभागी होता येणार आहे. निसर्गानुभव कार्यक्रम २०२४ मध्ये सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म लिंक १३ एप्रिल २०२४ पासून www.mahaforest.gov.in वर उपलब्ध असेल. इच्छुकांनी सदर लिंक उघडून गुगल फॉर्मद्वारे माहिती भरावयाची आहे. भरलेले फॉर्म २० मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत पाठवावेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा या तत्त्वावर निवड केली जाईल. सहभागी व्यक्तींना २३ मे रोजी दुपारी ३ ते दि. २४ मे रोजी सकाळी ८ पर्यंत मचाणावर बसून वन्यप्राण्यांची निरीक्षणे करता येईल.