Satara: नवजाचे पर्जन्यमान चार हजारी; कोयना साठा ८५ टीएमसीजवळ

By नितीन काळेल | Published: July 29, 2024 06:34 PM2024-07-29T18:34:28+5:302024-07-29T18:34:54+5:30

जिल्ह्यात पाऊस सुरूच : २४ तासांत महाबळेश्वरला ९३ मिलिमीटर; वीरमधील विसर्ग घटला 

Navaja's rainfall is moving towards 4000 mm in satara; 85 TMC water storage in Koyna Dam | Satara: नवजाचे पर्जन्यमान चार हजारी; कोयना साठा ८५ टीएमसीजवळ

संग्रहित छाया

सातारा : जिल्ह्यात पाऊस सुरूच असून नवजाच्या पर्जन्यमानाने चार हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला. तर कोयना, नवजाच्या पावसाचीही चार हजार मिलिमीटरकडे वाटचाल सुरू आहे. तर २४ तासांत सर्वाधिक पर्जन्यमान महाबळेश्वरला ९३ मिलिमीटर झाले. त्याचबरोबर कोयना धरणपाणलोट क्षेत्रातही पाऊस असल्याने साठा ८५ टीएमसीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. तर वीर धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे.

जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यातही पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला आहे. तर पश्चिमेकडे कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वरला धुवाॅंधार पाऊस झाला. यामुळे प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. परिणामी धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करावा लागला. सध्या पश्चिमेकडे पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. तरीही धरणात पाण्याची आवक सुरूच आहे.

सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ७१ तर नवजाला ६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ३ हजार ४७६ तर नवजा येथे ४ हजार ५५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. महाबळेश्वरलाही आतापर्यंत ३ हजार ७५५ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धरणात आवक घटली आहे. सकाळच्या सुमारास ३८ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणात ८४.८५ टीएमसी पाणीसाठा होता. ८०.६२ टक्के धरण भरलेले आहे. त्याचबरोबर कोयनेतील विसर्ग कायम आहे. पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू असून त्यातून २ हजार १०० आणि सहा दरवाजातून ३० हजार असा एेकूण ३२ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरू असून हे पाणी कोयना नदीत जात आहे.

वीरमधून १४ हजार क्यूसेक विसर्ग नीरा नदीपात्रात..

पुणे जिल्ह्यातील वीर धरणपाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरूच आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून पाणी विसर्ग करण्यात येत आहे. त्यातच सध्या पावसाचा जोर कमी झाला असून धरणातील पाणीपातळी ५७९.४५ मीटरवर आहे. त्यामुळे सांडव्याद्वारे २३ हजार १८५ क्यूसेक असणारा विसर्ग कमी करण्यात आला. सोमवारी पहाटेपासून १३ हजार ९११ क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. पावसाचे प्रमाण पाहून विसर्ग कमी किंवा जास्त करण्यात येणार आहे. तरीही नीरा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

Web Title: Navaja's rainfall is moving towards 4000 mm in satara; 85 TMC water storage in Koyna Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.