Satara: वाहनांतील डिझेल चोरणारी नवी मुंबईची टोळी अटकेत, जिथं चोरी तिथंच विक्री
By दत्ता यादव | Published: October 10, 2023 01:56 PM2023-10-10T13:56:27+5:302023-10-10T14:02:26+5:30
सातारा : महामार्गावर रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरणाऱ्या टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. त्यांच्याकडून चोरीचे डिझेल आणि मोबाइल, ...
सातारा : महामार्गावर रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरणाऱ्या टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. त्यांच्याकडून चोरीचे डिझेल आणि मोबाइल, तसेच एक वाहन हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी रात्री दहा वाजता करण्यात आली.
करण जगदीश निर्मल (वय २९ गणेश सोसायटी, जुगाव वाशी, मुंबई), राशीद जावेद खान (वय २८, रा. पिंताबर अपार्टमेंट, जुगाव वाशी, मुंबई), धीरज नरेंद्र वर्मा (वय २२, रा. कोपरखैरणे, बोनकोवडे, मुंबई), समीम साहेबमियाॅं हुसेन (वय १९, रा. दाखिलभाई बालकृष्ण पाटील नेरुळ गाव राममंदिर जवळ, नवी मुंबई) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या सुमारास विश्रांतीसाठी अनेक मालट्रक थांबत असतात. हीच संधी साधून ही टोळी या वाहनांतील डिझेल चाेरत होती. अशा प्रकार वारंवार घडत असल्याने पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आॅंचल दलाल यांनी एलसीबीचे एक स्वतंत्र पथक तयार केले. हे पथक रात्रीच्या सुमारास सातारा ते शिरवळ असे गस्त घालत होते.
दरम्यान, पाचवड, ता. वाई गावच्या हद्दीतील एका हाॅटेलसमोर वरील संशयित हे कार थांबवून डिझेल खरेदी करावयाचे आहे का, अशी वाहनचालकांना विचारणा करत होते. हा प्रकार तातडीने गस्तीवर असलेल्या एलसीबीच्या पथकला तसेच भुईंज पोलिसांना समजला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेऊन चारही तरुणांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चाैकशी केली. त्यांच्याजवळ असलेल्या कॅनमधील डिझेल भुईंजजवळील प्रतापगड ढाब्यासमोर उभ्या असलेल्या एका टेम्पोमधून चोरल्याची कबुली त्यांनी दिली. हे चोरीचे डिझेल आणि चोरीसाठी वापरलेली कार, मोबाइल, असा सुमारे ४ लाख ५१ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्र मोरे, पोलिस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, सचिन साळुंखे, सनी आवटे, अरुण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, गणेश कापरे, ओंकार यादव, पृश्वीराज जाधव आदींनी कारवाईत भाग घेतला.
जिथं चोरी तिथंच विक्री..
या टोळीने ज्या परिसरात डिझेल चोरलं. त्याच परिसरात डिझेल विक्री करत होते. यापूर्वीही त्यांनी अशाच प्रकारे डिझेल चोरी करून विक्री केल्याने त्यांचे धाडस वाढले. त्यामुळेच पुन्हा त्याच ठिकाणी डिझेल विक्रीचा त्यांचा डाव पोलिसांनी धुळीस मिळविला.